हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत असताना, शिमलाच्या कृष्ण नगर परिसरात भूस्खलनाच्या ताज्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. शोधमोहीम आणि बचावकार्य सुरू आहे. या घटनेनंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील अनेक घरांना भेगा पडल्या असल्याचे स्थानिक सांगत आहेत. घरांना भेगा वाढत चालल्याचे दिसल्यानंतर त्यांनी लगेचच अनेक घरे रिकामी केली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
‘शिमल्यामधील अनेकांच्या घरांमध्ये भेगा पडल्याचे दिसताच त्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर, शिमल्यातील कृष्णनगरमध्ये भूस्खलनाच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून त्यातील एकाचा मृतदेह सापडला आहे. तसेच, ज्यांच्या घरांना भेगा आढळत असतील, त्यांनी त्वरित घर रिकामे करावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सख्खू यांनी केले आहे.
हे ही वाचा:
चाचणी न देताच संघात आलेल्या विनेशची आशियाई स्पर्धेतून माघार
केंद्र सरकारने ठरवले टॉमेटो विकायचे ५० रुपये किलो दराने!
भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ध्वजारोहण !
सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे निधन
‘आम्ही जेव्हा घरांना भेगा पडल्याचे पाहिले, तेव्हाच सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क केले. आम्ही लगेचच सर्वांना घरे रिकामी करण्यास सांगितले. याच दरम्यान आम्ही पाहिले की, कितीतरी घरे जमीनदोस्त झाली आहेत. आम्ही सुमारे २० ते २५ घरे रिकामी केली आणि ५० लोकांना वाचवले. या सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे,’ अशी माहिती स्थानिकांनी दिली. तर, ‘आम्ही यात अडकलेल्या लोकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही १० ते १५ घरे रिकामी केली आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे,’ असे पोलिस अधीक्षक संजीव गांधी यांनी सांगितले.