प्रख्यात उर्दू कवी, गीतकार गुलजार आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक जगद् गुरू रामभद्राचार्य यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय साहित्यक्षेत्रात अतिशय मानाच्या अशा ५८व्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा शनिवारी करण्यात आली.
गुलजार यांना याआधी सन २००२मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, सन २०१३मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, सन २००४मध्ये पद्मभूषण आणि किमान पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तर, चित्रकूटमधील तुलसीपीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे प्रसिद्ध विद्वान, शिक्षक आणि १००हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत.
हे ही वाचा:
संदेशखाली अत्याचार प्रकरण; तृणमूल नेत्याला अखेर अटक!
देशभरातील न्यायालयांत ४.४७ कोटी खटले प्रलंबित
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या दर्शनाची नवी व्यवस्था
सन १९५०मध्ये उत्तर प्रदेशातील जौपनपूरच्या खांदीखुर्द गावात जन्मलेले रामभद्राचार्य रामानंद संप्रदायाच्या विद्यमान चार जगद्गगुरू रामानंदाचार्यांपैकी एक आहेत. सन १९८८पासून ते या पदावर आहेत. ते २२ भाषा बोलतात. त्यांनी संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली यांसह अनेक भाषांमध्ये रचना केल्या आहेत. सन २०१५मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान केला होता. रामभद्राचार्य हे प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक गुरू, शिक्षक आहेत. त्यांनी चार महाकाव्यांसह २४०पेक्षा अधिक पुस्तके आणि ग्रंथ लिहिले आहेत.
सन १९४४पासून देण्यात येणारा ज्ञानपीठ पुरस्कार दरवर्षी भारतीय साहित्यातील योगदानासाठी दिला जातो. संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दुसऱ्यांदा तर, उर्दू भाषेसाठी पाचव्यांदा देण्यात येत आहे.
वाग्देवीची प्रतिमा, २१ लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.