जम्मू आणि काश्मीरने गेल्या चार वर्षांत शांतता आणि विकासाच्या नवीन युगाची सुरुवात केली आहे,’ असे प्रतिपादन नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सुफीवादावरील इंडियन मायनॉरिटिज फाऊंडेशन (आयएमएफ) परिषदेत केले. सुफीवादाने काश्मीरमध्येच बाळसे धरले. खोऱ्याचा जातीय सलोखा आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाचा वारसा अतुलनीय आहे, असे आयएएमएफचे संयोजक सतनाम सिंह संधू यांनी सांगितले.
काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच सर्व मुस्लिम पंथांचे नेते शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी श्रीनगरमध्ये एका सामायिक व्यासपीठावर मोठ्या संख्येने एकत्र आले होते. तेथे त्यांनी जम्मू आणि काश्मीरची प्रतिमा बदलल्याबद्दल आणि विकासाचे नवीन मार्ग उघडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. सुनी, शिया, सुफी, दाऊदी बोहरा, पसमंदा मुस्लिम आणि गुज्जर-बकरवालांसह विविध मुस्लिम समुदायांच्या धार्मिक नेत्यांनी गेल्या तीन दशकांपासून दहशतवादाने ग्रासलेल्या प्रदेशात शांतता आणि स्थिरता पुनर्स्थापित केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.
‘गेल्या चार वर्षांत विकासाचे नवीन मार्ग खुले झाले आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे. जम्मू-काश्मीर आणि देशाच्या इतर भागांतील हे नेते शनिवारी आयएमएफतर्फे श्रीनगरमधील प्रतिष्ठित शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (एसकेआयसीसी) येथे सुफीवाद आणि काश्मीरियत या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेत एकत्र आले.काश्मीरमधील सांप्रदायिक सलोखा, आदरातिथ्य, शांतता, सहिष्णुता आणि समजूतदारपणाची जुनी परंपरा आणि सध्याच्या काळातील त्याची प्रासंगिकता यावर या परिषदेत प्रकाश टाकण्यात आला.
जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ही परिषद ‘सुफिवाद और काश्मीरियत: शांती और सद्भाव की मिसाल’ या थीमवर आयोजित करण्यात आली होती. काश्मीरची संस्कृती अद्वितीय आहे आणि खोऱ्यातील शांततापूर्ण सहजीवनाची परंपरा अनुकरणीय असल्याचे परिषदेतील वक्त्यांनी अधोरेखित केले. सर्व मुस्लिम पंथांचे धार्मिक नेते, विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी, व्यापारी आणि पर्यटन संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी, शेतकरी संघटना आणि विविध स्वयंसेवी संस्था या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयएमएफचे निमंत्रक सतनाम सिंग संधू यांच्यासह आयएमएफचे इतर प्रतिनिधीही उपस्थित होते. प्रमुख वक्त्यांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक क्रांतीवादी आणि इस्लामिक विद्वान डॉ. मौलाना सय्यद कल्बे रुशैद रिझवी; सुफी इस्लामिक बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष मन्सूर खान; काश्मीरचे एक प्रमुख मौलवी आणि ‘तेहरिक ए सौतुल औलिया’ या धार्मिक संघटनेचे प्रमुख मौलाना अब्दुल रशीद दाऊदी, चिस्टी फाउंडेशनचे अध्यक्ष सय्यद सलमान चिस्टी, लेखक आणि धार्मिक उपदेशक डॉ फैयाज अहमद, लेखक आणि पसमंदा मुस्लिम समाजाचे नेते जाहिद परवाझ चौधरी आदी उपस्थित होते.
हे ही वाचा:
‘पुन्हा येईन’ व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांची उडवली खिल्ली
गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त
‘मी टायगर नाही, मी राणे आहे’, निलेश राणे!
‘काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात अभूतपूर्व पातळीवर परिवर्तन झाले आहे. ‘जम्मू आणि काश्मीर ही पवित्र भूमी आहे. येथे विविध धर्म आणि संस्कृतींचा विकास झाला आहे. परंतु दुर्दैवाने, गेल्या तीन दशकांत ही भूमी हिंसाचार आणि दहशतवादाने बरबटलेली होती, ज्यामध्ये आपल्या शेजारी देशाची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी खोऱ्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जम्मू-काश्मीरमधील नागरिकांच्या योगदानाने येथे आमूलाग्र बदल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अथक परिश्रमाने काश्मीर खोऱ्याचा कायापालट केला आहे. शाळा, महाविद्यालये, व्यवसायांवर परिणाम करणाऱ्या बंदचा काळ आता संपला आहे.
दगडफेक ही आता भूतकाळाची गोष्ट झाली आहे. येथील प्रत्येक नागरिक आपापल्या इच्छेनुसार जीवनाचा आनंद घेत आहेत. काश्मीरमध्ये चांगले जुने दिवस परत आले आहेत आणि हिंसाचार आणि दहशतवादाचे युग संपले आहे. आता हे शांतता आणि समृद्धीचे पर्व सदैव चालू राहावे आणि काश्मीरच्या प्रत्येक नागरिकाने ‘अमृत काल’ दरम्यान देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,’ असे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी परिषदेला संबोधित करताना सांगितले. जम्मू आणि काश्मीर नवीन उंची गाठत आहे आणि विकासाच्या नवीन कथा लिहित आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्याला विकसित भारताचे व्हिजन दिले आहे, असे सिन्हा म्हणाले.