जम्मू-काश्मीरच्या ऐतिहासिक तीन टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा आज (१८ सप्टेंबर) मोठ्या शांततेत पार पडला. पहिल्या फेरीत सात जिल्ह्यांतील एकूण २४ जागांसाठी मतदान झाले आणि यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथे ५८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ७७.२३ टक्के मतदान किश्तवाड जिल्ह्यात तर पुलवामा जिल्ह्यात सर्वात कमी ४३.८७ टक्के मतदान झाले. किश्तवाड जिल्ह्यातील इंद्रावल जागेवर ८० टक्के पेक्षा जास्त मतदान झाले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षानंतर मतदान होत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची नजर आजच्या मतदानाच्या आकडेवारीवर होती. भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, किश्तवाड जिल्ह्यात सर्वाधिक ७७.२३ टक्के तर पुलवामा येथे सर्वात कमी ४३.८७ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात २३ लाखांहून अधिक मतदार ९० अपक्षांसह २१९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
हे ही वाचा :
‘या’ देशांमध्ये पेजर्सचा अजूनही होतोय वापर, वापरण्याची कारणेही आलीत समोर!
मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मालोकरच्या बरगड्या मोडल्या होत्या! हृदयविकाराने मृत्यू नाही
छे छे, राहुल गांधी दहशतवादी नाहीत…
इस्रो आता शुक्रावरची गुपितं उलगडणार; चांद्रयान- ४ मोहिमेलाही हिरवा कंदील
जम्मू-काश्मीरमध्ये मुख्य लढत भाजप, काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स (आघाडी), पीडीपी यांच्यात असल्याचे मानले जात आहे. भाजपने जम्मूतील सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, तर दुसरीकडे काश्मीरमध्ये मोजकेच उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी दोन्ही क्षेत्रात निवडणूक लढवत आहे. याशिवाय अन्य छोट्या पक्षांनीही ही लढत रंजक बनविण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, मतदानावेळी मतदारसंघामध्ये, मतदान बुथवर सैनिक-पोलिस तैनात करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान २५ सप्टेंबरला होणार आहे, तर तिसऱ्या टप्प्यातील १ ऑक्टोबरला होणार आहे आणि मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे.