७ जुलैपासून ९९९ रुपयांत जीओ भारत फोन

पहिल्या टप्प्यात होणार दमदार विक्री

७ जुलैपासून ९९९ रुपयांत जीओ भारत फोन

रिलायन्स जीओ कंपनी भारतात जीओ भारत ४ जी फोन आणत आहे. पहिल्या जीओ भारत फोनची विक्री ७ जुलै रोजीपासून सुरू होणार आहे. या पहिल्या टप्प्यात १० लाख फोनची विक्री केली जाणार आहे.

भारताच्या ‘टूजीमुक्त भारत’ मोहिमेला वेग देण्यासाठी हा फोन दाखल केला जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनी कार्बन या कंपनीसह भागीदारीत दोन जीओ भारत फोन आणणार आहे. अन्य कंपन्याही ‘जीओ भारत फोन’ बनवण्यासाठी लवकरच जीओ भारत व्यासपीठाचा वापर करतील, असे कंपनीने म्हटले आहे.

सोप्या शब्दांत सांगायचे तर वाजवी किमतीत बाजारात फोन दाखल करण्यासाठी कंपनीने अन्य कंपन्यांना भागिदारी करण्याचे आमंत्रण दिले आहे.

पहिल्या टप्प्यात १० लाख जीओ भारत फोनची विक्री केली जाणार आहे. ७ जुलैपासून या विक्रीला सुरुवात होईल. हे फोन देशभरातील किरकोळ विक्रीच्या दुकानांत उपलब्ध असतील, असे कंपनीने सांगितले आहे.

जीओ भारत फोन हा सर्वसामान्य फोनसारखा दिसणारा फोन असला तरी तो स्मार्ट ४ जी फोन असेल. फोनच्या स्क्रीनखाली कीपॅड असेल आणि स्क्रीनखाली भारत असे लिहिले असेल. फोनच्या मागे कॅमेरा तसेच स्पीकर असेल. जीओ भारत फोनच्या माध्यमातून देशभरात मोफत कॉल केले जातील. तसेच, यातून छायाचित्रेही काढली जातील आणि जीओ पेच्या माध्यमातून यूपीआय व्यवहारही केले जातील. तसेच, मनोरंजनासाठी जीओसिनेमा, जीओ सावन आणि एफएम रेडिओही असतील.

जीओ भारत फोन दोन मॉडेलमध्ये दाखल होत आहेत. एका मॉडेलच्या मागे ‘जीओ’ असे लिहिलेले असून दुसऱ्या मॉडेलच्या मागे ‘कार्बन’ लोगो असेल. तसेच, निळा आणि लाल असे रंगांचे दोन पर्याय असतील.

रिलायन्स जीओने ‘जीओ भारत’साठी १२३ रुपयांचा एक आणि १२३४ रुपयांचा दुसरा असे प्लॅनही जाहीर केले आहेत. यातील १२३ रुपयांच्या प्लॅनमध्ये १४ जीबीचा (प्रतिदिन ०.५ जीबी) डाटा मिळणार आहे. तर, अमर्यादित कॉल्सची मुदत २८ दिवस असेल. तर, वार्षिक १२३४ रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण १६८जीबी (०.५ जीबी) डाटा आणि अमर्यादित कॉल्सची सुविधा मिळेल. जे जीओ ब्रँडचे फोन घेतील त्यांना हे प्लॅन खरेदी करता येऊ शकतील. तर, अन्य कंपन्यांच्या भागिदारीतील फोन (तूर्त केवळ कार्बन) घेणाऱ्यांना २८ दिवसांच्या मुदतीचा १७९ रुपयांचा प्लॅन तर, १७९९ रुपये किमतीचा वर्षभराचा प्लॅन घेता येईल. दोन्ही प्लॅनमधील सुविधा या जीओ भारत फोननुसारच असतील.

हे ही वाचा:

अमेरिकन गायिका मिलबेन राहुल गांधींवर उखडल्या

फ्रान्समध्ये हिंसाचार प्रकरणी ३ हजार अटकेत; बहुसंख्य मुस्लिमांचा समावेश

उद्धव ठाकरेंचे आता काय होणार?

तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष; आव्हाडांना, जयंत पाटलांना हटवले

‘अजूनही २५ कोटी लोकांकडे टूजी फोन आहेत. लोक ५जीपर्यंत पोहोचले असताना अजूनही त्यांना इंटरनेटच्या प्राथमिक सुविधांचाही लाभ घेता येत नाही. त्यासाठीच हे फोन आणले आहेत,’ असे रिलायन्स जीओचे संचालक आकाश अंबानी यांनी सांगितले.

Exit mobile version