झुलनने केली महिला विश्वचषकातील ‘या’ विक्रमाची बरोबरी

झुलनने केली महिला विश्वचषकातील ‘या’ विक्रमाची बरोबरी

भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने तिच्या कारकिर्दीत आणखी एक नवीन टप्पा गाठला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी महिला विश्वचषकातील आठवा सामना खेळला जात आहे. या सामन्यात गोलंदाज झुलन गोस्वामीने विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केलेले आहे. झुलनने आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या माजी गोलंदाज लिन फुलस्टन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

महिला विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाची माजी खेळाडू लिन फुलस्टनच्या नावावर होता. लिनने १९८२ ते १९८८ दरम्यान विश्वचषकात ३९ विकेट घेतल्या होत्या. झुलनने आज न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात मार्टिनच्या विश्वचषकातील ३९ वी विकेट घेतली आहे. भारत आपला पुढचा सामना वेस्ट इंडीजविरुद्ध खेळणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात झुलन गोस्वामी आयसीसी विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकते.

झुलन २००५ सालापासून महिला विश्वचषकात भाग घेत आहे. तसेच, हा तिचा पाचवा विश्वचषक आहे. तर झुलनने आतापर्यंत १९७ वनडे सामन्यात २४८ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये तिने २ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

हे ही वाचा:

पंजबमध्ये चालला झाडू

शिवसेनेच्या हाती फक्त फिश करी राईस!

गोव्यात भाजपाच्या सरकार स्थापनेच्या हालचाली; १४ मार्चला शपथविधी?

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचा अभिनेता पाशा ली ठार

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात भारतीय कर्णधार मिताली राजने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऍमी सदरवेट (७५) आणि एमिलिया केर (५०) यांच्या शानदार खेळीमुळे न्यूझीलंड संघाने निर्धारित ५० षटकात ९ विकेट्स गमावत २६० धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर भारताकडून गोलंदाजी करताना पूजा वस्त्राकारने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच राजेश्वरी गायकवाडने २ विकेट्स घेतल्या आणि झुलन गोस्वामी व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येक १ विकेट खिशात घातली.

Exit mobile version