ऐतिहासिक वास्तुंची सफाई आणि संवर्धन करण्याच्या हेतूने पुण्यातील तरूणाई पुढे सरसावली आहे. यासाठी ‘झुंज’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. ‘झुंज’आवाहनाला प्रतिसाद देत एकत्र येऊन नानासाहेब पेशवे यांच्या समाधीची स्वच्छता या तरूणांनी केली आहे.
शनिवार दिनांक २० फेब्रुवारी आणि रविवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी ‘झुंज’ तर्फे नानासाहेब पेशव्यांच्या समाधीची स्वच्छता करण्यात आली आहे. सुमारे ७० लोकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला असून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या तरूणांना सर्वतोपरी सहकार्य केले आहे. पुणे महानगरपालिके तर्फे या तरूणांना सफाईचे सर्व साहित्य पुरवण्यात आले. या मोहिमेला समाज माध्यमांवरूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रामुख्याने ट्विटर आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अनेक स्वयंसेवक या मोहिमेशी जोडले गेले.
हे ही वाचा:
प्रियदर्शनी उद्यानातील १२१५ झाडे गेली कुठे? आदित्य ठाकरेंचे दुटप्पी पर्यावरणप्रेम
मोहिमेच्या दिवशी स्वयंसेवकांनी तीन गटात विभागून काम केले. यावेळी संपूर्ण परिसरातील प्लास्टिक, मेलेली झाडं झुडपं काढून टाकली आणि परिसर स्वच्छ केला. काही लोकांनी चित्र साफ करण्याचे काम हाती घेतले तर काही लोकांनी गवात काढण्याचे कार्य हाती घेतले. या मोहिमेत इतिहास अभ्यासक अनिश गोखले आणि उदय कुलकर्णी हे देखील उपस्थित होते. या दोघांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आगामी काळात अशा आणखीन मोहीमा राबवणार असल्याची माहिती ‘झुंज’ चे मल्हार पांडे यांनी दिली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नानासाहेब पेशव्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचे आश्वासन दिल्याचेही मल्हार पांडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याला गौरवशाली इतिहासाची मोठी परंपरा लाभली आहे. पण या इतिहाच्या साक्षीदार असलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तू दुर्लक्षित असतात. या गोष्टीसाठी शासन-प्रशासनाच्या नावाने बोटं मोडणारे अनेक सापडतात पण पुण्यातील ‘झुंज’ संस्थेने या विषयात कृतीशील पाऊल उचलायचे ठरवले आहे. दुर्लक्षित होऊन खराब झालेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या स्वच्छतेचा विडा ‘झुंज’ ने उचलला आहे.