स्वतः नाटककार असलेली व्यक्ती समीक्षक बनली की, आपल्या हितसंबंधांसाठी दुसऱ्या नाटकाबद्दल फारसे टीकात्मक लिहित नाहीत, असे होऊ शकते. पण जयंतच्या बाबतीत तसे अजिबात नव्हते. त्याने आपल्यातील नाटककार आणि समीक्षक या दोन्ही भूमिका एकमेकांपासून वेगळ्या ठेवल्या. आपल्या समीक्षेमुळे आपल्या स्वतःच्या नाटकाला निर्माते मिळाले नाहीत तर… य़ाची त्याने कधी पर्वा केली नाही, अशा शब्दांत नाट्यसमीक्षक रवींद्र पाथरे यांनी दिवंगत जयंत पवार या आपल्या सुहृदाबद्दल भावना व्यक्त केली.
रविवार २९ ऑगस्टला नाट्यसमीक्षक, नाटककार, पत्रकार जयंत पवार यांचे निधन झाले. त्यामुळे नाट्यसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
पाथरे म्हणतात, वृत्तपत्रीय समीक्षेला कमलाकर नाडकर्णी, प्रशांत दळवी यांच्याप्रमाणेच जयंतनेही एक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याआधी, वृत्तपत्रीय समीक्षेला फारसे स्थान नव्हते. पण या तिघांनी एक मापदंड घालून दिला. त्यामुळे या समीक्षेला वजन प्राप्त झाले, एक उंची प्राप्त झाली.
पाथरे सांगतात, जयंतचं आयुष्य जगावेगळं होतं. त्याची आई लवकर गेली त्यामुळे आईची पोकळी त्याला कायम जाणवली. त्याच्या लेखनातून, जडणघडणीतून ते वारंवार दिसत राहिलं. त्यामुळेच असेल कदाचित रेल्वेत गरीब मुले, तृतियपंथी येत त्यांना तो नेहमीच पैसे देतच असे. आपण अशा लोकांना टाळतो. पण त्याने नेहमी अशा लोकांच्या हातात पैसे ठेवून त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली. त्यांचा नाईलाज म्हणून त्यांना हात पसरावे लागतात. आपण सगळ्यांनीच त्यांना दुर्लक्षित केलं तर त्यांनी जगायचं कसं? असा त्याचा दृष्टिकोन होता.
पाथरे आणि जयंत पवार हे अनुक्रमे लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रात समीक्षा करत होते. त्याबद्दल पाथरे म्हणतात की, आम्ही वेगवेगळ्या वर्तमानपत्रात काम करत असलो तरी एकमेकांचे प्रतिस्पर्धी कधीही नव्हतो. ‘अधांतर’ या त्याच्या नाटकाचे समीक्षण मलाच करण्याची संधी मिळाली. त्यावर्षीचे सर्वोत्तम नाटक आहे हे मला तेव्हाच लक्षात आले होते. मी त्यालाही ते सांगितले पण तो हुरळून वगैरे गेला नाही.
त्याची एक खुबी होती ती म्हणजे कोणत्याही वेगळ्या मीडियामधील व्यक्ती त्याच्याकडे आली तर त्याला मदत करण्याची त्याची भूमिका होती. प्रतिस्पर्धी वर्तमानपत्रातला आहे म्हणून कधी त्याने दुर्लक्ष केले नाही.
पाथरे म्हणतात, पत्रकार असल्यामुळे त्याच्याकडे एक वेगळी दृष्टी होती. तटस्थपणे, त्या विषयात गुंतून ते लिहिण्याची वृत्ती त्याच्याकडे होती. गिरणगावात तो लहानाचा मोठा झाला त्याबद्दल त्याच्या हृदयात एक हळुवार कोपरा होता. तिथली माणसं, त्यांचं जगणं, त्यांची झालेली वाताहत हे त्याच्या लेखनातून वेळोवेळी जाणवत राहिलं.
अधांतरवर बेतलेल्या लालबाग परळ आणि सिटी ऑफ गोल्ड या चित्रपटांतून गिरणगावातील विदारक परिस्थिती समोर आली. गिरणगावातील माणसाची चिवट वृत्ती त्यांच्या लेखनातून समोर आली. स्वतः त्याने गिरणी कामगार म्हणून काम केलेले असल्यामुळे त्याच्याशी त्याचे भावनिक नाते होते. स्वतःचे आयुष्य आईविना गेले असले तरी त्याबद्दल त्याने कधी लिहिले नाही. त्याबद्दल सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न त्याने कधीही केला नाही. शेवटचा लेख मात्र त्याने वडिलांबाबत लिहिला. प्रथमच तो आपल्या वडिलांबद्दल लिहिता झाला. कर्करोग झाल्यामुळे त्याला मृत्युची चाहुल जाणवत होती. त्याच्या या लेखातून त्याने वडिलांना असे जणू सांगितले की, आपली भेट लवकरच होईल. त्याची वेदना त्यातून दिसत होती.
हे ही वाचा:
यंदा विमान तिकीट आरक्षणाची गगनाला गवसणी!
लव्ह जिहादच्या घटनेने हादरले नेवासा…दलित कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे अपहरण
गजाआड! करत होते अल्पवयीन मुलीचा ऑनलाईन लैंगिक छळ
माझ्या पप्पांचा पगार द्या! वेतन नसलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीची आर्त हाक
पाथरे सांगतात, जयंतच्या जाण्यामुळे किती पोकळी निर्माण होईल हे येणारा काळ ठरवेल, पण त्या दर्जाची नाट्य समीक्षा करणे हे आव्हान नक्कीच असेल. तो दर्जा किती टिकेल, याबद्दल शंकाही मनात आहे. नाट्यसमीक्षेचा तो स्तर कायम ठेवण्यासाठी नाटकांकडे अभ्यासू वृत्तीने पाहण्याची गरज कायम असेल. पण पोकळी भरून निघावी, अशी आशा नक्कीच व्यक्त करू शकतो.