भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव आणि भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा हे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत. जय शहा हे आयसीसीचे सर्वात तरुण कार्याध्यक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत.
आयसीसीचे मावळते कार्याध्यक्ष ग्रेग बार्कले यांच्या जागी आता जय शहा हे सूत्रे स्वीकारतील. आयसीसीच्या या पदासाठी जय शहा हे एकमेव दावेदार आहेत. आयसीसीने यासंदर्भात म्हटले आहे की, २० ऑगस्टला हे स्पष्ट करण्यात आले की, विद्यमान कार्याध्यक्ष ग्रेग बार्कले यांना तिसऱ्यांदा हे पद सोपविले जाणार नाही.
हे ही वाचा:
…ते भाग्य स्वप्नीलच्या वाट्याला कधी येणार?
‘नबन्ना अभियान’; कोलकाता पोलिसांकडून २३ महिलांसह १२६ आंदोलकांना अटक!
मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावे कुणीतरी मागितले ५०० रुपये!
लव्ह जिहादच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या मुलीला न्याय द्या!
जय शहा हे आयसीसीच्या कार्याध्यक्षपदी विराजमान होणारे पाचवे भारतीय आहेत. याआधी, जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन, शशांक मनोहर यांनी हे काम केलेले आहे.
आयसीसी ही जागतिक स्तरावर क्रिकेटचे व्यवस्थापन पाहणारी संस्था असून क्रिकेटच्या प्रमुख स्पर्धांचे नियोजन करते. १०० देश या संस्थेचे सदस्य आहेत.
जय शहा यांचे यासंदर्भातील निवेदन आयसीसीने जारी केले आहे. त्यांनी त्यात म्हटले होते की, मी आयसीसीसोबत आणि सदस्य देशांसोबत काम करण्यास सज्ज आहे. क्रिकेटचे विविध प्रकार, नवे तंत्रज्ञान आणि क्रिकेटच्या विविध प्रमुख स्पर्धांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देणे आणि त्यांची सांगड घालणे हे आमचे काम असेल. क्रिकेटला कधीही नव्हती एवढी लोकप्रियता मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे.
जय शहा यांनी म्हटले आहे की, २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा जो समावेश झाला आहे, त्यामुळे क्रिकेटची आणखी वाढ आणि प्रगती होईल.