पांढरकवडा (जि. यवतमाळ) येथील सूरज जयस्वाल यांना कोरोना झाला होता. कोरोनामधून सावरताच या ४३ वर्षीय रुग्णाला गंभीर स्वरूपाचा म्युकरमायकोसिस झाला. हा आजार इतका गंभीर झाला की, त्याच्यावर शस्त्रक्रिया करून त्याचा वरचा जबडा काढावा लागला. अशा वेळी शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय त्याच्या मदतीला धावून आले. रुग्णासाठी मोठ्या परिश्रमाने कृत्रिम जबडा तयार करण्यात आला. मोठी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून यशस्वी प्रत्यारोपणही करण्यात आले.
म्युकरमायकोसिसनंतरचे हे पहिलेच जबडा आणि दंत प्रत्यारोपण ठरले. म्युकरमायकोसिस या आजाराचे निदान होताच सूरज यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या जबड्याचा काही भाग काढण्यात आला. त्यानंतर टायटॅनियम धातूद्वारे कृत्रिम जबडा बनवण्यात आला. हा जबडा बनविण्यासाठी एका खासगी कंपनीची मदत घेण्यात आली. त्यानंतर अत्यंत गुंतागुंतीची अशी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली. आता जबड्यात कृत्रिम दात बसविण्याची प्रक्रिया होणार आहे.
हे ही वाचा:
…म्हणून व्हाॅट्सॲप, फेसबुक झाले होते बंद
गीतकार जावेद अख्तरविरुद्ध गुन्हा दाखल
‘हा’ अवलिया बेटावर तब्बल ३२ वर्षे एकटाच राहत होता… वाचा सविस्तर
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी सांगितले की, म्युकरमायकोसिसच्या ११८ रुग्णांची नोंद झाली असून यातील ६० रुग्णांवर शस्त्रक्रिया करून कोणाचा खालचा तर कोणाचा वरचा जबडा काढावा लागला. नागपूर एम्समधील १० रुग्णांवरही शस्त्रक्रिया केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या रुग्णालयाकडे ७० रुग्ण त्या प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत.