राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर स्पष्ट झाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. तर महाविकासआघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीने २३० जागांवर विजय मिळवला. यात भाजप १३२ जागा, शिवसेना शिंदे गट ५७ आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ४१ जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त ४६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी भाजपाला विशेष करून उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आरक्षणावरून लक्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा महायुती सरकारला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक उपोषण केले आणि समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. मात्र, काही वेळानंतर उपोषणादरम्यान मनोज जरांगे हे सरकारला शिवीगाळ, टीका, टिप्पणी, उमेदवारांना पाडण्याची भाषा करू लागले. विशेष करून जरांगे हे केवळ महायुती, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष करताना दिसले. मविआच्या नेत्यांवर कोणतीच टीका केली नाही किंवा त्यांच्या उमेदवारांना पाडण्याची भाषा केली नाही. यावरून त्यांची राजकीय भाषा सर्वांना समजू लागली असल्याचे म्हणत सत्ताधारी नेत्यांनी टीका केली.
काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभेच्या काही जागांवर ‘जरांगे फॅक्टर’ चालला, त्यामुळे महायुतीला फटका बसला अशी चर्चा होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही ‘जरांगे फॅक्टर’ चालेल अशी चर्चा होती. मात्र, यावेळी असे कोणतेच चित्र दिसले नाही. महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून मते दिली आणि महायुती विजयी झाली. यावरून मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत, आम्ही निवडणुकीच्या मैदानातच नव्हतो असे म्हटले आहे.
मनोज जरांगे म्हणाले, जेवढे आमदार निवडून आले ते मराठा समाजामुळे आले आहेत. गोड बोलून आमची मते घेतली, सरकार हे मराठ्यांमुळेच आले आहे. आरक्षणासाठी मराठा समाज उभा आहे. आता सरकारने बेईमानी न करता आम्हाला आरक्षण द्यावे. तसे नाही केले की, तुम्हाला भोगावे लागेल. ते पुढे म्हणाले, आम्ही मुळात म्हणजे निवडणुकीच्या मैदानात नव्हतोच. आरक्षण दिले नाहीतर पुन्हा उपोषणाला बसू, असा इशारा त्यांनी दिला.
एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नसून विजय मिळविणे अवघड असते, माझ्या समाजाला संकटात सोडायचे नव्हते म्हणून मी लोकसभेसारखे विधानसभेला देखील मराठा समाजाला सांगितले कि ‘तुम्ही तुमच्या मताचे मालक आहात, योग्य माणूस निवडा’.
ते पुढे म्हणाले, मराठा समाजाशिवाय राज्यात सरकार कोणीही स्थापन करू शकत नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी देखील काल आपल्या भाषणात सांगितले कि मराठा समाजसुद्धा सोबत होता. पण, काही विरोधक म्हणत आहेत कि, ‘जरांगे फॅक्टर’ फेल झाला. अशा लोकांना मी एकच सांगेन, आम्ही मैदानातच नव्हतो तर आम्ही कसे फेल होवू? मराठा समाजाला बंधनमुक्त केला होता, आम्हाला कोणत्याच उमेदवारावर राग नाही. समाजाने आपले काम केले आहे, असे जरांगे म्हणाले.
हे ही वाचा :
आंध्र प्रदेशात बसची ऑटो रिक्षाला धडक बसून ७ जण ठार
मुस्लिम धर्मगुरू नोमानीविरोधात तक्रार दाखल
वंदे भारत गाड्यांवर दगडफेक ; दोघांना अटक
सैन्य दलात सायबर, आयटी डोमेन तज्ञांची होणार भरती