इटलीच्या यानिक सिनर याने रशियाच्या दानिल मेदवेदेव याचा ३-६, ३-६, ६-४, ६-४, ६-३ असे पराभूत करून पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅमला गवसणी घातली. त्याने उपांत्य फेरीत गतविजेत्या नोव्हाक जोकोविचला पराभवाचा धक्का दिला होता.
अंतिम लढत तीन तास आणि ४४ मिनिटे चालली. सिन्नर हा १९७६नंतर ग्रँडस्लॅम जिंकणारा इटलीचा पहिला खेळाडू. त्यावेळी आद्रिआनो पनाट्टा याने ही कामगिरी केली होती. तसेच, जोकोविच, जिम कुरिअरनंतर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा तिसरा युवा खेळाडू ठरला आहे. तसेच, सन २०१४पासून मेलबर्न पार्क येथे जोकोविच, नदाल आणि फेडरर यांच्याव्यतिरिक्त नवा विजेता मिळाला. सन २०१४मध्ये ही स्पर्धा स्टॅन वॉवरिंकाने जिंकली होती. हा अपवाद वगळता २००६पासून या त्रिकुटाचे ऑस्ट्रेलियन ओपनवर वर्चस्व होते.
हे ही वाचा:
नितीश कुमार बिहारचे नवव्यांदा मुख्यमंत्री
विंडीजच्या जोसेफने घेतले ७ बळी, गॅबावर ऑस्ट्रेलियाला केले पराभूत
चांदीच्या झाडूने केली जाणार प्रभू राम मंदिराच्या गर्भगृहाची स्वच्छता!
बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदी सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांची वर्णी
मेदवेदेवने अंतिम फेरीत जोशात सुरुवात केली. त्यामुळे ही लढत एकतर्फी होईल, असे वाटत होते. मेदवेदेवने दोन सेट जिंकून तशी पायाभरणीही केली. मात्र तिसऱ्या सेटपासून सिनरने प्रतिकार सुरू केला. चौथ्या सेटमध्ये सिनरने मेदवेदेवला दमवले. पाचव्या सेटमध्ये सिनरने सर्व अस्त्रांचा वापर करताना मेदवेदेवला फारशी संधी दिली नाही. मेदवेदेवला पुन्हा विजेतेपदाच्या जवळ पोहोचूनही त्याविनाच परतावे लागले. २०२१चा अमेरिकन ओपन विजेता मेदवेदेव तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत झाला.
सिनरचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद. तो पहिल्यांदाच ग्लँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.
‘विजेतेपदामुळे खूप खुश आहे. कोर्टवरील प्रतिकूल परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामोरा गेलो. चाहत्यांनी मला सातत्याने प्रोत्साहन दिले. ते खूप मोलाचे आहे. दोन सेटच्या पिछाडीनंतर मागे असताना सकारात्मक विचार केला. खेळाच्या योजनेत कोणताही बदल केला नाही. त्यामुळेच यश लाभले,’ अशी प्रतिक्रिया सिनर याने दिली.