१०२ अब्ज डॉलर केले दान
गेल्या १०० वर्षांत जागतिक स्तरावर सर्वाधिक दानशूर व्यक्ती म्हणून टाटा उद्योगसमुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांची नोंद झाली आहे. भारतासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांनी केलेल्या देणगीचे मूल्य १०२ अब्ज डॉलर इतके असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एडेलगिव्ह फाऊंडेशन आणि हुरुन इंडिया यांनी केलेल्या शतकातील सर्वोत्तम दानशूर व्यक्तीच्या अभ्यासातून टाटा यांच्या नावाला सर्वाधिक पसंती लाभली आहे. जगातील सर्वोत्तम ५० दानशूर व्यक्तींचा शोध या अभ्यासात घेण्यात आला. या यादीत ३९ जण हे अमेरिकेतील आहेत. त्यानंतर ५ जण ब्रिटनमधील, ३ चीनमधून तर २ भारतातील आहेत.
विप्रोचे अझीम प्रेमजी हे भारतातील दुसरे दानशूर व्यक्ती आहेत. या ५० जणांत त्यांचा क्रमांक १२वा आहे. त्यांनी दिलेल्या देणगीचे मूल्य २२ अब्ज डॉलर इतके आहे. आरोग्यक्षेत्रात त्यांनी या देणग्या दिल्या आहेत.
हे ही वाचा:
भाऊ तोरसेकर यांना डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान पुरस्कार
ओबीसी आरक्षणाचा ठाकरे सरकारने मुडदा पाडला
कंगना रनौत स्वतःच दिग्दर्शित करणार ‘इमर्जन्सी’
बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या, पण स्कायवॉक पूर्ण करा!
या दानशूर व्यक्तींमध्ये पहिल्या पाचमध्ये जमशेदजी टाटा हे अव्वलस्थानी असून बिल आणि मेलिंडा गेट्स हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी ७४.६ अब्ज डॉलर इतकी संपत्ती दान केली आहे. हेन्री वेलकम यांनी ५६.७ अब्ज डॉलर, हॉवर्ड ह्युजेस ३८.६ अब्ज, वॉरन बफे ३७.४ अब्ज आणि अझीम प्रेमजी २२ अब्ज डॉलरसह १२व्या स्थानी आहेत.
या ५० दानशूर व्यक्तींनी मिळून ८३२ अब्ज डॉलर इतकी धनसंपदा दान केली आहे.
या संशोधनात असेही स्पष्ट झाले आहे की, आजच्या काळातील अनेक अब्जाधीश हे ज्या प्रमाणात कमाई करत आहेत, त्या तुलनेत त्यांच्याकडून दान केले जात नाही. अमेझॉनचे जेफ बेझोस, टेस्लाचे इलन मस्क, फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांची नावे या यादीत दिसत नाहीत, त्याबद्दल आश्चर्य प्रकट केले जाते.