‘कॅनडा कधीही कोणताही पुरावा देत नाही, परंतु तेथे झालेल्या गुन्ह्यांसाठी भारताला दोष देतो,’ अशी टीका भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केली आहे.खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी कॅनडा पोलिसांनी तीन भारतीय नागरिकांना अटक केली आहे. त्यानंतर कॅनडाचे पोलिस या प्रकरणात संभाव्य भारतीय दुवे शोधत असल्याचे सांगितल्यानंतर जयशंकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
कॅनडाने पंजाबमधील संघटित गुन्हेगारीला, तेथून काम करण्यास परवानगी दिली आहे, अशी टीका परराष्ट्र मंत्र्यांनी भुवनेश्वर येथे पत्रकार परिषदेत केली.‘तीन लोकांना अटक करण्यात आल्याचे वृत्त मला नुकतेच समजले. ते वरवर पाहता कुठल्या तरी टोळीची पार्श्वभूमी असलेले भारतीय आहेत. पोलिसांकडून याबाबत काय अधिक माहिती मिळेल, त्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. परंतु सर्वसाधारणपणे जर तुमचा राजकीय अजेंडा नसेल, तर माझा ज्यांच्यावर संशय आहे, त्यांना मी पुरावा सादर करेन,’ असे ते म्हणाले. ‘आम्हाला कॅनडाने कधीही भारत सरकारचा सहभाग असल्याचा पुरावा सांगणारे काहीही दिलेले नाही. खरं तर, आम्ही तुम्हाला (कॅनडाच्या सरकारला) वारंवार सांगितले आहे, तुमच्याकडे काही असेल तर कृपया आम्हाला द्या,” जयशंकर म्हणाले.
कमिशनर मेरी-जोसी हॉग यांच्या कॅनेडियन अहवालात कॅनडाच्या समुदायांवर आणि राजकारण्यांवर प्रभाव टाकण्यासाठी कॅनडा-स्थित काही भारतीय अधिकाऱ्यांनी काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कॅनडातील समस्या व्होट बँकेच्या राजकारणामुळे उद्भवल्याचा दावा जयशंकर यांनी केला. ‘सत्ताधारी पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. ज्या पक्षावर ते अवलंबून आहेत ते खलिस्तानी समर्थक आहेत. भारताने सातत्याने कॅनडाला फुटीरतावाद्यांना थारा देऊ नका, त्यांना राजकीय वैधता देऊ नका, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे भारत आणि कॅनडा या दोघांच्या संबंधांमध्ये समस्या निर्माण होतील,’ असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
गुजरातवरील विजयामुळे बेंगळुरूच्या ‘प्लेऑफ’मध्ये जाण्याच्या आशा जिवंत!
कथित अनुचित कपडे परिधान करून व्हिडीओ
‘रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी’
‘माझ्याजवळ अशी २५ उदाहरणे आहेत, जे एकतर खलिस्तानी समर्थक आहेत किंवा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या टोळ्यांचा भाग आहेत. आम्ही त्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती केली आहे, मात्र त्यावर त्यांनी काहीही केले नाही. तेथे टोळीयुद्ध सुरू आहे. ते प्रत्येक वेळी भारतावर दोष ढकलतात. पण तिथल्या तपास यंत्रणा कधीच पुरावा देत नाहीत. मला वाटते की हा एक राजकीय खेळ आहे,’ अशी टीका जयशंकर यांनी केली.
‘पाकिस्तानात इतके दहशतवादी का?’
जयशंकर यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा ब्रिटनमधील एका दैनिकातील स्तंभात भारत पाकिस्तानमध्ये हत्या करत असल्याचा आरोपही फेटाळून लावला. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, पाकिस्तानमध्ये असे गुन्हे करण्यासाठी दहशतवाद्यांची कमतरता नाही. ‘दहशतवादाची पार्श्वभूमी असणाऱ्या काहींचा मृत्यू असामान्य परिस्थितीत झाला आहे. त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. दहशतवादीच एकमेकांविरुद्ध कारवाया करत असतील. परंतु ते लोक का मरत आहेत, हे सांगण्यापेक्षा, पाकिस्तानात इतके दहशतवादी का आहेत आणि पाकिस्तान त्यांचे इतके संरक्षण का करत आहे, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी आधी दिले पाहिजे,’ असे ते म्हणाले.