आपल्याला सर्वांना माहीत आहे, साहेब (शरद पवार) कसे नेते आहेत ते. पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार हे गेले होते पण तो त्यांचा निर्णय होता का? जर ते स्वतःहून गेले असते तर त्यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री केले असते का? साहेबांनी त्यांना संधीच दिली नसती. पण हे सत्य तुम्हाला कुणीच सांगत नाही, अशा शब्दांत अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी शरद पवारांवर शरसंधान केले आहे.
अजित पवार यांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना खासदारकीसाठी बारामतीमधून उभे करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर कुटुंबीयांकडून सातत्याने टीका होत होती. त्याला अजित पवारांनी उत्तरही दिले पण आता थेट त्यांचे पुत्र जय पवार यांनीच त्यांचे आजोबा शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.
जय पवार यांनी आणखी एक उदाहरण दिले ते म्हणजे, दादांवरती ईडीच्या कारवाया सुरू असताना ईडीच्या कार्यालयात त्यांना बोलावण्यात आले होते. तेव्हा त्यांच्यासोबत होते फक्त छगन भुजबळ. पण जेव्हा रोहित पवार यांच्यावर ईडीने समन्स बजावले तेव्हा त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे, प्रतिभा आजी आणि स्वतः साहेबही गेले. मग अशावेळी केवळ साहेबांच्या बाजूनेच भावनिक का व्हायचं? अजित दादांच्या बाजूने का भावनिक व्हायचं नाही.
हे ही वाचा:
‘पुतना‘ मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना मोदीजींमध्ये ‘पुतीन‘ दिसायला लागलेत!
सलमानच्या घरावर हल्ल्यासाठी वापरलेले पिस्तुल सापडले तापी नदीच्या पात्रात
सिंगापूरनंतर हाँगकाँगने देखील एमडीएच आणि एवरेस्टच्या मसाल्यांवर घातली बंदी!
जेएनयूमधील ‘फुकट्यां’चा बंदोबस्त होणार!
जय पवार म्हणतात की, मीडियाचा वापर करून दादांनी कसे चुकीचे केले यावर टीका केली जाते. पण अनेक वर्षे दादा सर्वांसाठी काम करत आहेत. करोनाच्या काळातही दादा मंत्रालयात जाऊन बसत असत. त्यांना करोनाही झाला पण त्यांनी माघार घेतली नाही. कुठे काय कमी पडत आहे, कुणाला मदत हवी हे त्यांनी पाहिलं. दादा संपूर्ण राज्यात काम करत होते.
याच दरम्यान जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, बारामतीत एका कार्यक्रमात आपण आणि सुप्रिया आत्या एकत्र आलो. तेव्हा देवाजवळ आपण आधी नारळ ठेवावा असे त्यांनी मला सांगितले. मी तेव्हा नारळ ठेवून डोळे मिटून प्रार्थना करत होतो तेव्हा शेजारी बारामतीचे शहराचे अध्यक्ष जय पाटील आले. तेव्हा सुप्रिया आत्या म्हणाल्या की, जय कसं चाललंय. मला वाटले त्या मला बोलत आहेत म्हणून मी डोळे उघडले तर त्या जय पाटील यांच्याशी संवाद साधत होत्या. पण या प्रसंगाचा व्हीडिओ पाठवून त्यांनी खोटी बातमी तयार केली की, सुप्रिया ताईंनी जय पवार यांची विचारपूस केली. ही अशी बातमी करून त्यांनी काय मिळवलं.
जय पवार म्हणाले की, आज सुप्रिया आत्या म्हणतात की, त्यांना संसदरत्न मिळाला आहे. पण तो सरकारचा पुरस्कार नाही. खासगी एनजीओच्या माध्यमातून तो देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे भोर तालुक्याला काय मिळालं?