जगातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट आठ संघ हे उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले. यापैकी स्पेन विरुद्ध स्वित्झर्लंड आणि बेल्जियम विरुद्ध इटली हे दोन सामने शुक्रवार, २ जुलै रोजी पार पडले. यापैकी पहिल्या सामन्यात स्पेनने स्वित्झर्लंडला हरवत उपांत्य फेरी गाठली तर उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बेल्जियम आणि इटली हे दोन तुल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. जर्मनी येथील अलियांझ एरेना या स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता. उपांत्य फेरी गाठण्यासाठी या दोन्ही संघांनी कंबर कसली होती.
सामन्याच्या पहिल्या हाल्फ पासूनच हा सामना अटीतटीचा होता. सामन्याच्या ३१ व्या मिनिटाला निकोलो बरेला याने गोल करत इटलीला आघाडी मिळवून दिली तर ४४ व्या मिनिटाला लोरेंझो इन्सेना याने गोल करत ही आघाडी २-० अशी वाढवली. पण पहिल्या हाल्फचा नियोजित ४५ मिनिटांचा खेळ संपता संपता इटलीच्या बचाव फळीतील खेळाडूने फाऊल केल्यामुळे बेल्जियम संघाला पेनल्टी मिळाली. बेल्जियम संघाचा कर्णधार रोमेलो लुकाकु याने या पेनल्टी वर गोल करत सामन्याचा स्कोर २-१ असा केला.
हा सामन्याचा अंतिम निकाल ठरला. दुसऱ्या हाल्फमध्ये बेल्जियमने सामन्यात परतण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. इटलीने त्यांना रोखून धरले. या विजयासह इटलीचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्यफेरीत इटलीचा सामना स्पेनसोबत होणार आहे. मंगळवार, ६ जुलै रोजी रात्री १२.३० वाजता हा सामना खेळवला जाणार आहे.