जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेली युरो कप फुटबॉल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा पहिला सामना रंगणार असून या स्पर्धेचा पहिला अंतिम फेरीतील संघ ठरणार आहे. मंगळवार, ६ जुलै रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री १२.३० वाजता हा उपांत्य फेरीचा पहिला सामना रंगणार आहे. ज्यामध्ये स्पेन आणि इटली हे दोन दादा संघ एकमेकांना भिडणार आहेत.
१२ जून पासून युरो कप फुटबॉल स्पर्धेचे धुमशान सुरु झाले. खरं तर ही स्पर्धा २०२० सालीचा होणे अपेक्षित होते. पण कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलली गेली. या स्पर्धेसाठी एकूण २४ संघ हे साखळी सामन्यांसाठी पात्र झाले असून यातले एकूण १६ संघ हे पुढल्या फेरीत दाखल झाले. तर नॉकआऊट स्वरूपाच्या राऊंड ऑफ १६ मधून एकूण ८ संघ हे उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले. या आठ संघांमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामान्यांमधून स्पेन, इटली, इंग्लंड आणि डेन्मार्क हे चार संघ उपांत्य फेरीत दाखल झाले.
६ आणि ७ जुलै रोजी हे उपांत्य फेरीचे सामने रंगणार असून यातील पहिला सामना स्पेन आणि इटली या दोन संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यात स्पेन आणि इटली या दोन संघांपैकी नेमके कोण जिंकणार याकडे साऱ्यांचे लक्ष्य लागले आहे. स्पेन संघात मोराटा, जॉर्डि अल्बा, सर्जिओ बुस्केट्स अशा सतार खेळाडूंचा भरणा आहे. तर इटलीकडेही जॉर्जियो किलीनी, सिरो इमोबिले अशा दर्जेदार खेळाडूंची ताकद आहे. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार यात शंकाच नाही.