लंडनमधील महाराष्ट्र भवनच्या वास्तूत येताना वेगळाच आनंद वाटतो

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावना

लंडनमधील महाराष्ट्र भवनच्या वास्तूत येताना वेगळाच आनंद वाटतो

संपूर्ण इंग्लंडमध्ये महाराष्ट्राचे अनेक मंच आहेत मात्र लंडन महाराष्ट्र मंडळाला शंभर वर्षाची परंपरा असून त्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेले आहे. त्यामुळे मला महाराष्ट्र भवनच्या या वास्तूत येताना विशेष आनंद वाटत असल्याची भावना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स् आणि इंग्लंडच्या अभ्यास दौऱ्यावर असून २ सप्टेंबर रोजी अभ्यास दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात युरोपमधील मराठी संस्कृतीचा केंद्रबिंदू ठरलेल्या महाराष्ट्र मंडळास या शिष्टमंडळाने भेट देऊन संवाद साधला.

 

यादरम्यान, डॉ. गोऱ्हे यांनी या अभ्यास दौऱ्याचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की, महाराष्ट्र विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधी कृषी, शिक्षण, आरोग्य यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवर मुद्दे मांडत असतात. या प्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघात या मुद्द्यांवर काम करताना अधिक सोपं व्हावं किंवा अधिक सक्षमीकरण व्हावं हा त्याचा हेतू आहे. त्याचप्रमाणे अभ्यासामधून अधिक अभ्यास व्हावा आणि आपल्या कामांना अधिक चालना देता यावी, हा दौऱ्याचा हेतू असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

हेही वाचा..

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात रॉकेटला गती

ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक श्रावण गिरी यांचे अपघाती निधन

शाश्वत विकासाबाबत जर्मनी, नेदरलँड आणि लंडन येथील सरकार काम करण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. शाश्वत विकासाची एकूण १७ उद्दिष्टे आहेत. यातील अनेक मुद्द्यांवर महाराष्ट्र सरकार काम करत आहे. सर्व युरोपात अन्नप्रक्रियेच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो याबाबत मुद्दे ठळकपणे समोर आले. परंतु त्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना यासंदर्भात जे निर्णय झाले आहेत त्यांची माहिती होणे आवश्यक असल्याचे येथील भारतीय दूतावासातील झालेल्या चर्चेत समोर आले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

याआधी जपान येथे अभ्यास दौरा झाला. तेथून महाराष्ट्रात आल्यावर उद्योग, औद्योगिक, विधी व न्याय विभाग यासोबत बैठक घेऊन जपानमधून आलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. मानसिक स्वास्थ्य, स्थलांतरित लोकांच्या व महिलांच्या समस्या, शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण बाबतच्या मुद्द्यांना व्यापक शासकीय आधार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. महिला सक्षमीकरणावर भर देऊन खऱ्या अर्थाने त्यांना न्याय देण्याचे काम करण्याचे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

Exit mobile version