भारताने बुधवार, २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान- ३ च्या यशस्वी मोहिमेसह इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. या यानाचे लँडिंग हे कमांड मिळताच स्वतः लँडरने केले. या लँडिंगसाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे एआयची मदत घेतली होती.
एआय तंत्रज्ञानाचा वापर आता सर्वच क्षेत्रात होत असून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान- ३ मध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केला. बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाचं लँडर मॉड्यूल हे चंद्रावर उतरलं. यासाठी ऑटोमॅटिक लँडिंग सीक्वेन्सचा वापर करण्यात आला होता. बंगळुरूमधील मिशन कंट्रोलने लँडिंगची सूचना दिल्यानंतर, विक्रम लँडरने स्वतःच सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
विक्रम लँडरची स्थिती, गती आणि अल्टिट्यूड या सर्व गोष्टींना एआय सेन्सर्सच्या माध्यमातून सांभाळण्यात आलं. सोबतच, लँडरची चंद्राच्या पृष्ठभागापासून असणारी उंची मोजण्यासाठी देखील वेगळ्या एआय सेन्सर्सचा वापर करण्यात आला. तर लँडर मॉड्यूलवर असणारे कॅमेरे देखील एआय पॉवर्ड होते. इथून कमांड देताच लँडरने पुढील प्रक्रिया स्वतःच यशस्वीपणे पार पाडली. एआय सेन्सर्सने दिलेल्या माहितीमुळे लँडरचे लोकेशन ट्रॅक करणं सोपं झालं. यामुळेच लँडिंग सुरू असताना लाईव्ह फोटोज इस्रोला मिळत होते. यामुळेच इस्रोसोबतच सर्वसामान्यांना देखील विक्रम लँडरचा वेग, चंद्राच्या पृष्ठभागापासून त्याची उंची, चंद्राचे फोटो अशा गोष्टी पाहू शकत होते.
चांद्रयान- ३ च्या लँडरने या टप्प्यात अनेक निर्णय स्वतः घेतले. लँडिंगसाठी जागा निवडणे, योग्य जागेचा शोध घेणे, अनुकूल स्थिती नसल्यास पुढे जाऊन नवीन जागा शोधणे आणि कमांड मिळाल्यानंतर लँडिंगची प्रक्रिया सुरू करणे या सर्व गोष्टी लँडर मॉड्यूलने स्वतःच केल्या. यासाठी देखील एआयची मदत घेण्यात आली होती.
हे ही वाचा:
विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा हा क्षण!
वक्फ बोर्डाच्या मालमत्तेबाबत दिल्लीतील जामा मशिदीला नोटीस
भारत चंद्रावर आहे; चांद्रयान- ३ च्या यशानंतर इस्रो प्रमुख सोमनाथन यांचे गौरवोद्गार
कांद्याचा प्रश्न मिटला, लासलगाव, सोलापूरमध्ये लिलाव सुरू
चांद्रयान- ३ ला ४ वाजून ५० मिनिटांनी अंतिम कमांड देण्यात आली. त्यामुळे हे यान बुधवारीच चंद्रावर उतरणार हे निश्चित झाले होते. त्यानंतर ५ वाजून ४५ मिनिटांनी लँडिंग प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर ठीक ६ वाजून ४ मिनिटांनी यानाने चंद्राच्या पार्श्वभूमीला स्पर्श केला. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा ३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर हे यान ४० दिवसांनी चंद्रावर पोहचले. चांद्रयान- ३ ने १४ जुलै २०२३ या दिवशी आंध्रप्रदेशातील श्री हरिकोटा येथून आपल्या चंद्राकडे जाणाऱ्या प्रवासाला सुरुवात केली होती.