चांद्रयानानंतर इस्रोचे ‘गगनयान’ भरारी घेणार!

महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेच्या तयारीला सुरुवात

चांद्रयानानंतर इस्रोचे ‘गगनयान’ भरारी घेणार!

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजेच ‘इस्रो’ची महत्त्वाकांक्षी मोहीम ‘चांद्रयान- ३’ ही अंतिम टप्प्यात आहे. हे यान आता चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे. तर दुसरीकडे इस्रोने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेच्या तयारीला सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदाच मानवाला अवकाशात पाठवणार आहे. त्यामुळे ही मोहीम खास असणार आहे.

गगनयानाच्या ड्रोग पॅराशूटची चाचणी इस्रोने यशस्वीपणे पार पाडली असून गगनयानातून अवकाशात गेलेल्या अंतराळवीरांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी ही चाचणी अत्यंत आवश्यक होती. गगनयानच्या क्रू मॉड्यूलला स्थिर करण्यासाठी हे ड्रोग पॅराशूट कामी येणार आहेत.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, ८ ते १० ऑगस्ट दरम्यान चंदिगढमध्ये असणाऱ्या टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबमध्ये ही चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. याठिकाणी असलेल्या रेल ट्रॅक रॉकेट स्लेजचा वापर करुन ड्रोग पॅराशूट तपासण्यात आले. इथल्या सर्व चाचण्या यशस्वी पार पडल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

कसे असतात ड्रोग पॅराशूट?

एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (ADRDE) आणि DRDO यांनी संयुक्तपणे या चाचण्या घेतल्या. ड्रोग पॅराशूट हे ५.८ मीटर व्यासाचे रिबिन सारखे पॅराशूट असतात. त्यांना मोर्टार म्हणूनही ओळखलं जातं. हे सिंगल फेज रीफिंग यंत्रणेचा वापर करतात. एखाद्या वेगाने जाणाऱ्या वस्तूला झटका देऊन न थांबवता, अलगदपणे तिचा वेग कमी करण्यासाठी यांचा वापर केला जातो.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डीपीवर तिरंगा

भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदावर चौथ्यांदा कोरले नाव

आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी

राज्यातील ‘आयटीआय’मध्ये व्हर्चुअल क्लासरूम सुरू होणार

गगनयान या महत्त्वाच्या मोहिमेद्वारे इस्रो पृथ्वीच्या खालच्या कक्षेत मानव असलेले अवकाशयान पाठवणार आहे. या मोहिमेसाठी इतर देशांवर अवलंबून न राहता, स्वदेशी क्षमता विकसित करणे हे इस्रोचे उद्दिष्ट आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या मोहिमेसाठी जाणार्‍या अंतराळवीरांना पृथ्वीवर जशी लाइफ सपोर्ट सिस्टीम असते तशी उपलब्ध करून दिली जाईल, असं इस्रोने स्पष्ट केलं आहे. त्यासाठी इस्रोची तयारी सुरू असून चांद्रयान मोहिमेनंतर जगाचे भारताच्या गगनयान मोहिमेकडे लक्ष असणार आहे.

Exit mobile version