पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी (इस्रो) काही महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘शुक्रयान’ म्हणजेच व्हीनस ऑर्बिटर मिशनला (VOM) ग्रीन सिग्नल दिला असून चांद्रयान- ४ मोहिमेलाही मंजुरी दिली आहे. यामुळे अंतराळ क्षेत्रात भारताला नव्या संधी मिळणार आहेत.
एनडीए सरकारच्या नेतृत्वात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत इस्रोने भविष्यात आखलेल्या काही मोहिमांना मंजुरी देण्यात आली आहे. चांद्रयान आणि मंगळयान यशस्वी झाल्यानंतर आता शुक्राचा अभ्यास करण्याचे लक्ष्य इस्रोकडून ठेवण्यात आले आहे. शुक्र ग्रहाच्या अभ्यासातून अंतराळातील आणखी काही गुपितं उलगडण्याची शक्यता आहे. व्हीनस ऑर्बिटर मिशनच्या माध्यमातून एक विशेष अंतराळयान तयार केले जाईल जे केवळ शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून शुक्राभोवती फिरेल. यावरून शुक्र ग्रहाचा पृष्ठभाग, तेथील वातावरण, सूर्याचा प्रभाव अशा काही घटकांची माहिती मिळू शकणार आहे. २०२८ साली ही मोहीम प्रक्षेपित होणार आहे.
हे ही वाचा :
कोचिंग सेंटरच्या नावाखाली ख्रिश्चन धर्मांतराचा कट, ११ मुलांची सुटका !
गणेश उत्सवात जिहाद्यांकडून ११ ठिकाणी हल्ले
डब्यांसाठी प्रसिद्ध असलेला ब्रँड टप्परवेअर दिवाळखोरीत!
पुढच्या वर्षी लवकर या… २३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला भावूक निरोप
यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाने चांद्रयान- ४ मोहिमेलाही हिरवा कंदील दाखवला आहे. चंद्रावर लँडिंग, तिकडचे नमुने गोळा करणे आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे या गोष्टी या मोहिमेतून साध्या केल्या जाणार आहेत. या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेचे बजेट २,१०४.०६ कोटी (अंदाजे २५३ डॉलर्स दशलक्ष) असून हे भारताच्या दीर्घकालीन अंतराळ संशोधन उद्दिष्टांच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. चांद्रयान- ३ च्या ऐतिहासिक कामगिरीनंतर चांद्रयान- ४ कडून विशेष अपेक्षा असणार आहेत. याशिवाय मंत्रिमंडळाने भारतीय अंतरीक्ष स्टेशनच्या (BAS) स्थापनेलाही मंजुरी दिली आहे. गगनयान कार्यक्रमासाठीचा एकूण निधी २०,१९३ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.