इस्रो लवकरच प्रक्षेपित करणार जीसॅट-१
भारत लवकरच एक उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना बनवत आहे. हे प्रस्तावित उपग्रह प्रक्षेपण दिनांक २८ मार्च रोजी केले जाणार आहे. या उपग्रहामुळे भारताला सीमाप्रांतावर लक्ष ठेवण्यास सहाय्य होणार आहेच, त्याशिवाय भारताच्या हवामानाचा अंदाज बांधायला देखील हा उपग्रह फायदेशीर ठरणार आहे. जीसॅट-१ या उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा या प्रक्षेपण केंद्रावरून केले जाणार आहे.
हे ही वाचा:
भारतीय अवकाश संशोधन संस्थेेने (इस्रो) दिलेल्या माहितीनुसार उपग्रहाचे प्रक्षेपण हे हवामानावर देखील अवलंबून राहिल. हा उपग्रह पृथ्वीपासून ३६,००० किमी वर प्रस्थापित करण्यात येईल.
या उपग्रहाचे प्रक्षेपण ५ मार्च रोजी होणार होते. परंतु जीएसएलवी-एफ१० मार्फत होणारे हे प्रक्षेपण तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आले.
इस्रोच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा उपग्रह अनेक बाबतीत महत्त्वाचा आहे. या उपग्रहात उच्च दर्जाचे कॅमेरे लावले असून महासागरांवर आणि भारताच्या सीमांवर लक्ष ठेवण्यासाठी हा उपग्रह महत्त्वपूर्ण ठरणार आहे. इस्रोने सांगितले की जीसॅट-१ चे वजन २,२६८ किग्रॅ आहे. या उपग्रहामार्फत संकटांचा अचूक वेध घेण्याची क्षमता प्राप्त होणार आहे.
इस्रोने २८ फेब्रुवारी रोजी न्यू स्पेस इंडिया लिमिटेडचा ऍमेझॉनिया-१ या उपग्रहासह १८ उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते. हे उपग्रह पीएसएलव्ही-५१ मार्फत प्रक्षेपित करण्यात आले होते. या उपग्रहांपैकी पाच उपग्रहांची रचना विद्यार्थ्यांनी केली होती.