सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पाठवलेल्या आदित्य एल १ यानाने पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे. मंगळवारी इस्रोने ही माहिती दिली. आदित्य एल १ने १ सप्टेंबर रोजी श्री हरिकोटा येथून झेप घेतली होती. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही भारताची पहिलीच मोहीम आहे. सध्या हे यान पृथ्वीच्या किमान २८२ किमी आणि कमाल ४० हजार २२५ किमी कक्षेत फिरत आहे, अशी माहिती इस्रोने ‘एक्स’वर दिली.
आता १० सप्टेंबर रोजी पहाटे अडीच वाजता हे यान तिसऱ्या कक्षेत जाण्याचा प्रयत्न करेल. आदित्य एल १ ने ३ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या पहिल्या कक्षेत प्रवेश केला होता. आता हे यान पृथ्वीच्या आणखी दोन कक्षांमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर ते पृथ्वीबाहेरच्या कक्षेतील पॉइंट एल १ येथे स्थिरावण्यात येईल. हे अंतर पृथ्वीपासून १५ लाख किमी दूर आहे. या ठिकाणावरून सूर्याचे सतत तसेच, कोणत्याही अडथळ्याविना निरीक्षण करता येणार आहे. सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी ही जागा अतिशय सुयोग्य आहे. आदित्य एल १ हे यान १२७ दिवसांनंतर एल १ पॉइंटवर स्थिरावण्याची शक्यता आहे.
आदित्य एल १ यानाने १ सप्टेंबर रोजी श्री हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन संस्थेतून झेप घेतली होती. या यानाचे वजन एक हजार ४७२ किलो आहे. हे यान पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकल या बलाढ्य रॉकेटने प्रक्षेपित केले.
सूर्याच्या बाह्य वातावरणीय स्तर असलेल्या क्रोमोस्फीअर आणि करोना या स्तरांचा अभ्यास करणे, हे सूर्यमोहिमेचे प्राथमिक लक्ष्य आहे. या मोहिमेंतर्गत कोरोनल मास इजेक्शन, सूर्याच्या करोना स्तरावरील प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्राचे विश्लेषण केले जाईल.
हे ही वाचा:
जिल बायडेन करोना पॉझिटिव्ह; जी- २० साठी जो बायडेन यांच्यासह येणार होत्या भारत दौऱ्यावर
ओपन डेक बसमधून होणारे ‘मुंबई दर्शन’ बंद होणार
पुस्तक योग्यवेळी प्रकाशित झाले नाहीतर लोकाधिकारचं काम एकाधिकारवाल्यांनी लाटलं असतं
विरार वसई भागात धर्मांतर करणाऱ्यांचा पर्दाफाश !
आदित्य-L1 मध्ये सात पेलोड आहेत, ज्यात करोना स्तराचा अभ्यास करण्यासाठी व्हिजिबल एमिशन लाइन कोरोनाग्राफ (व्हीएलईसी), फोटोस्फियर आणि क्रोमोस्फियरची छायाचित्रे घेण्यासाठी सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (एसयूआयटी) आणि सोलर लो एनर्जी एक्स-रे यांचा समावेश आहे. एक्स-रे फ्लेअर्सचे विश्लेषण करण्यासाठी स्पेक्ट्रोमीटर आणि हाय एनर्जी एल १ ऑर्बिटिंग एक्स-रे स्पेक्ट्रोमीटरही या यानात आहेत.