‘गगनयान’ मोहिमेत महिलांचाही सहभाग असू शकतो’!

एस. सोमनाथ यांचा आशावाद

‘गगनयान’ मोहिमेत महिलांचाही सहभाग असू शकतो’!

‘बहुप्रतीक्षित अशी मानवी अंतराळयान मोहीम असणाऱ्या गगनयान मोहिमेत लढाऊ विमानांचे उड्डाण करणाऱ्या महिला वैमानिकांना अथवा महिला वैज्ञानिकांना प्राधान्य दिले जाईल. भविष्यात अशा महिलांना अंतराळात पाठवले जाऊ शकते,’ अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे संचालक एस. सोमनाथ यांनी दिली.
भारताने शनिवारीच आपल्या महत्त्वाकांक्षी अशा गगनयान मोहिमेतील पहिल्या मानवरहित उड्डाणाची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली.

तत्पूर्वी ही चाचणी प्रतिकूल हवामानामुळे काही काळासाठी थांबवण्यात आली होती. मात्र दोन तासांनंतर ही चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली. सध्या मानवरहित चाचणी केली असली तरी सन २०२५पर्यंत मानवी अंतराळ मोहीम राबवण्याचे भारताचे लक्ष्य आहे. ही मोहीम छोट्या कालावधीसाठी राबवण्यात येणार आहे. मात्र या मानवी अंतराळ मोहिमेसाठी भविष्यात अंतराळात जाऊ शकतील, अशा महिला उमेदवारांचा शोध घेणे क्रमप्राप्त आहे, असेही सोमनाथ यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा:

भटक्या कुत्र्यांमुळे डोक्याला इजा होऊन ‘वाघ बकरी चहा’चे संचालक पराग देसाई यांचा मृत्यू

कर्नाटकमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मुस्लीम विद्यार्थींनीना हिजाब घालण्यास काँग्रेस सरकारची परवानगी

गड आला; पण शतक हुकले, विराटची विक्रमाची संधी हिरावली

बावनकुळेंची नाही, शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी!

‘मानवी अंतराळ मोहिमेत सुरुवातीचे उमेदवार हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे वैमानिक असतील. आपल्याकडे आता महिला वैमानिक नाहीत. त्यामुळे जेव्हा त्या दाखल होतील, तेव्हा हा पर्यायही आपल्यासमोर असेल,’ असे ते म्हणाले. भविष्यात जेव्हा वैज्ञानिक कार्यक्रम वाढतील, तेव्हा वैज्ञानिक अंतराळ प्रवासी म्हणून जातील व अंतराळाबाबत आणखी माहिती जमवण्याचा प्रयत्न करतील आणि यामध्ये महिलांचा समावेश होण्याची शक्यता अधिक आहे, असा विश्वास ते म्हणाले.सन २०३५पर्यंत संपूर्णपणे कार्यक्षम असे भारताचे अंतराळ स्थानक उभारण्याचे आपले लक्ष्य असल्याचेही सोमनाथ यांनी सांगितले.

Exit mobile version