चांद्रयान- ३ च्या ऐतिहासिक कामगिरीसाठी आइसलँडकडून ‘इस्रो’चा सन्मान

आइसलँडच्या ‘एक्स्प्लोरेशन म्युझियम’ने ‘२०२३ लीफ एरिक्सन लूनर प्राइज’ने केलं सन्मानित

चांद्रयान- ३ च्या ऐतिहासिक कामगिरीसाठी आइसलँडकडून ‘इस्रो’चा सन्मान

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) यशस्वी चांद्रयान – ३ मोहिमेसाठी आइसलँडच्या हुसाविकमध्ये स्थित ‘एक्स्प्लोरेशन म्युझियम’ने ‘२०२३ लीफ एरिक्सन लूनर प्राइज’ने सन्मानित केले आहे. रेकजाविकस्थित भारतीय दूतावासाने ‘एक्स’वर याबाबत माहिती दिली. ‘चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच अंतराळयानाचे सॉफ्ट लँडिंग करणे आणि चंद्रासंबंधीच्या संशोधनात प्रगती करणे तसेच, अवकाशातील रहस्ये जाणून घेण्यासाठी दिलेल्या योगदानाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार दिला जात आहे,’ असे भारतीय दूतावासाने नमूद केले आहे.

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी या पुरस्कारासाठी निवड झाल्याप्रीत्यर्थ एक व्हिडीओ संदेश पाठवून या पुरस्काराबद्दल आभार व्यक्त केले. या पुरस्कार सोहळ्यात इस्रोच्या वतीने भारताचे राजदूत बी. श्याम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन २०१५पासून दरवर्षी एक्स्प्लोरेशन म्युझियमद्वारे ‘लीफ एरिक्सन’ पुरस्कार दिला जातो. ख्रिस्तोफर कोलंबस याने केलेल्या प्रवासाच्या सुमारे चार शतकांआधी महाद्वीप अमेरिकेत पाऊल ठेवणारा पहिला युरोपीय नागरिक लीफ एरिक्सन याच्या नावे हा पुरस्कार दिला जातो.

हे ही वाचा:

भावाला किडनी दिली म्हणून दिला तिहेरी तलाक!

कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकीनंतर साक्षी मलिक, विनेश फोगटचा कुस्तीला रामराम!

लोकसभेतून आणखी तीन विरोधी खासदार निलंबित!

उत्तर प्रदेशात वर्गमित्रांनी दहावीच्या विद्यार्थ्याला विवस्त्र करून केली मारहाण!

भारताच्या तिसऱ्या चांद्र मोहिमेंतर्गत चांद्रयान -३ ने चार महिन्यांपूर्वी चंद्राच्या दक्षिण धृवावर पहिल्यांदा पाऊल ठेवून ऐतिहासिक कामगिरी केली. चंद्राच्या पृष्ठभागार सॉफ्ट लँडिंग करण्याचा हा दुसरा प्रयत्न होता. अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचवण्यात आणि रोबोटिक रोव्हर प्रज्ञान चंद्रावर उतवरण्यात इस्रो यशस्वी झाले. आता हा पुरस्कार मिळाल्यामुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

Exit mobile version