चंद्रावरील त्या स्थळाला ‘शिवशक्ती’ नाव देण्यात चूक नाही

इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी दिले स्पष्टीकरण

चंद्रावरील त्या स्थळाला ‘शिवशक्ती’ नाव देण्यात चूक नाही

चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याठिकाणी चांद्रयान अवतरले त्या ठिकाणाला शिवशक्ती असे नामकरण केले होते. त्यावरून विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. पण यासंदर्भात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

सोमनाथ यांनी म्हटले आहे की, हे नामकरण करण्यात काहीही गैर नाही. पंतप्रधानांनी शिवशक्तीचा अर्थ समजावून सांगितला तो आपल्या सगळ्यांनाच पटणारा आहे. सोमनाथ यांनी केरळच्या थिरुवनंतपुरममध्ये जात पूर्णिमाकावू भद्रकाली मंदिराला भेट दिली. ते म्हणाले की, विज्ञान आणि श्रद्धा या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत, त्या एकमेकात मिसळण्याची अजिबात गरज नाही.

 

मी एक संशोधक आहे आणि चंद्रावर संशोधन करत आहे. अंतराळाचा शोध मी घेतो आहे. त्यामुळे हा सगळा माझ्या जीवनाचा एक भाग आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांचाही मी शोध घेत आहे. त्यामुळे मी अनेक मंदिरांना भेटी देतो, अध्यात्मावरील अनेक पुस्तके मी वाचतो. अंतराळातील आपले अस्तित्व आणि आपला प्रवास याविषयी मी माहिती घेत आहे. अंतर्मनाचा ठाव घेण्यासाठी मी अध्यात्माचा विचार करतो तर बाह्यमनासाठी मी विज्ञानाचा अभ्यास करतो.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालमध्ये फटाक्यांचा स्फोट; कारखान्याचे छप्पर उडाले, ८ ठार

भारतातील चैतन्य, विविधता पाहून जी-२० परिषद प्रभावित!

आईच्या हातच्या रस्समची चव चाखत प्रज्ञानंदने जग जिंकले

एकट्या पोलिसाने कोयता घेऊन हप्ते वसुली करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

इस्रोचे प्रमुख सोमनाथ म्हणाले की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिलाच देश आहे. या दक्षिण ध्रुवावर उतरणे कठीण होते. थोडीशी जरी चूक झाली असती तरी त्यातून मोहिमेला धक्का बसू शकला असता. दक्षिण ध्रुवाची आपण निवड केली कारण तिथे अनेक खनिजे आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी रोव्हर आपल्याला मदत करणार आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान ३ पोहोचल्यानंतर ऑनलाइन संदेश दिला होता नंतर ते भारतात आले तेव्हा बेंगळुरूत दाखल झाले आणि तिथे त्यांनी चांद्रयान उतरले त्या ठिकाणाला शिवशक्ती असे नामकरण केले. २०१९मध्ये ज्या ठिकाणी चांद्रयान २ उतरले पण तिथे त्याला समस्या आल्या. त्या ठिकाणाला तिरंगा पॉइंट असे नामकरण करण्यात आले आहे. त्यावरून काँग्रेसने संताप व्यक्त केला.

 

काँग्रेसचे रशीद अल्वी यांनी तर चंद्राला आपण विकत घेतलेले नाही, अशा शब्दांत टीका केली. त्यावर भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले होते की, चांद्रयान १ ही मोहीम यशस्वी ठरली नाही त्यानंतर ज्या ठिकाणी यान उतरले त्याला जवाहन पॉइंट म्हणून नाव ठेवण्यात आले होते.

Exit mobile version