हमासशी लढणाऱ्या इस्रायलच्या संरक्षण दलाला गाझा सीमेनजीक हमास दहशतवाद्यांकडून वापरला जाणारा सर्वांत मोठा भुयारी मार्ग आढळला आहे. हा भुयारी मार्ग ५० मीटर लांब असून त्याची उंची आणि रुंदी तीन मीटर म्हणजे १० फूट आहे. या भुयारी मार्गात विजेच्या जोडण्याही आढळल्या आहेत. हा बोगदा काँक्रीट आणि लोखंडी धातूच्या साह्याने बांधण्यात आला आहे. गाझापासून ते थेट सीमेपर्यंत दहशतवाद्यांना नेण्यासाठी या बोगद्याची रचना केल्याचे आढळले आहे.
७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला करून शेकडो लोकांना मारल्यानंतर आणि अनेकांचे अपहरण केल्यानंतर इस्रायलने आक्रमक भूमिका घेतली आहे. हमासला नेस्तनाबूत करण्याचा निर्धार इस्रायलने व्यक्त केला असून त्यानुसार, हमासकडून वापरले जाणारे बोगदे, बंकर उद्ध्वस्त करण्याचा पण इस्रायलने व्यक्त केला आहे. गाझा आणि इस्रायल दरम्यानच्या एरेझ सीमेवरून हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. चेकपॉइंटच्या केवळ १०० मीटर दक्षिणेस वाळूच्या ढिगाऱ्यात झाकलेला बाहेर जाण्याचा या बोगद्याचा मार्ग उपस्थित पत्रकारांना दाखवण्यात आला. हा भुयारी मार्ग तिरपा ५० मीटर खोल आहे, मात्र त्याची उंची आणि रुंदी तीन मीटर असून, त्यात विजेच्या जोडण्याही आहेत.
हे ही वाचा:
तरुणीला गाडीने धडक देणारा आयएएस अधिकाऱ्याच्या मुलगा अश्वजित अटकेत!
दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? कराचीच्या रुग्णालयात दाखल
उत्तराखंडमधील पर्यटक आता हवेत उडणार!
ठाकरेंनी अदानींचे विमान वापरले, पैसे नाही भरले!
या संपूर्ण भुयारी मार्गाची लांबी चार किमी असून यातून सहजच उत्तर गाझा शहरात पोहोचता येते, अशी माहिती मुख्य लष्करी प्रवक्ते रेअर ऍडमिरल डॅनिअल हगारी यांनी दिली. ‘सीमा पार करण्यासाठी गाझामध्ये आतापर्यंत सापडलेला हा सर्वांत मोठा भुयारी मार्ग आहे,’ असेही त्यांनी सांगितले. मात्र ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात या बोगद्याचा वापर करण्यात आला होता की नाही, याबाबत त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. ‘या बोगद्याची उभारणी करण्यासाठी लाखो डॉलर खर्च करण्यात आले आहेत. तसेच, काही वर्षे या बोगद्याची उभारणी होत होती. गाड्याही यातून जाऊ शकतील, इतका मोठा हा बोगदा आहे,’ असेही त्यांनी सांगितले. ‘रॉयटर्स’च्या प्रतिनिधींनी हमासशी संपर्क साधून याबाबत त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.