इस्रायलकडून युद्धविराम झाला नाही तर असेच होणार अपहरण!

हुती अपहरणकर्त्यांनी प्रसिद्ध केला व्हिडीओ

इस्रायलकडून युद्धविराम झाला नाही तर असेच होणार अपहरण!

येमेनच्या हूती विद्रोहींनी गॅलॅक्सी जहाजाच्या अपहरणाचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. जोपर्यंत इस्रायल गाझा पट्टीमध्ये युद्धविराम करत नाही, तोपर्यंत अशा प्रकारे जहाजांचे अपहरण होत राहील, असा इशारा अपहरणकर्त्यांनी दिला आहे. एक दिवस आधीच या विद्रोहींनी दक्षिण सागरात इस्रायलच्या जहाजाचे अपहरण केले आहे. या जहाजात एकही इस्रायली नागरिक नसल्याचे इस्रायलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे जहाज भारताच्या दिशेने येत होते.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हूती विद्रोहींनी सोमवारी गॅलॅक्सी लीडर जहाजाच्या अपहरणाचा कथित व्हिडीओ जाहीर केला. हा व्हिडीओ दोन मिनिटांचा आहे. विद्रोही एका हेलिकॉप्टरमधून आले आणि ते जहाजाच्या डेकवर उतरले. डेकवर उतरताच त्यांनी घोषणाबाजी केली आणि अंधाधुंद गोळीबार केला. त्यानंतर हे विद्रोही जहाजाच्या आत घुसले आणि त्यांनी व्हीलहाऊस व नियंत्रण कक्ष ताब्यात घेतला. या व्हिडीओत जहाजावरील क्रू गोंधळलेले दिसत असून त्यांनी हात वर केल्याचेही आढळले आहे.

हूतीचा प्रवक्ता मोहम्मद अब्दुल सलाम याने रविवारी ट्वीट करून ही तर केवळ सुरुवात आहे, अशी दर्पोक्ती केली आहे. जोपर्यंत गाझावरील हल्ले इस्रायल थांबवत नाही, तोपर्यंत अशाप्रकारे सागरी हल्ले बंद होणार नाहीत, असा इशारा आम्ही दिला होता.

हे ही वाचा:

वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

इस्रायलकडून लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

‘मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्यास मी खूप उत्सुक’

अबब!! १९२६ सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी मोजले २.७ मिलियन डॉलर्स

ब्रिटिश कंपनी जहाजाचे मालक
जहाजावर बहामासचा झेंडा लावण्यात आला आहे. जहाजावर युक्रेन, बुल्गारिया, फिलिपिन्स आणि मेक्सिकोसह विविध देशांचे सुमारे २५ जण आहेत. जहाजाची मालकी एका ब्रिटिश कंपनीची आहे. या कंपनीत इस्रायली व्यावसायिक अब्राहम उंगर यांचीही गुंतवणूक आहे. जेव्हा या जहाजाचे अपहरण झाले तेव्हा हे जहाज एका जपानी कंपनीला भाडेपट्ट्यावर दिले गेले होते.

नेतान्याहू यांचे इराणवर आरोप
अपहरणाच्या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हा प्रकार म्हणजे इराणच्या दहशतवादाचे आणखी एक उदाहरण असल्याचा आरोप केला आहे. इराण दुसऱ्या देशांच्या नागरिकांवर आपली दंडेलशाही चालवत असल्याचाही आरोप त्यांनी केला. मात्र इराणने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Exit mobile version