इस्रायलचा वेस्ट बँकमधील मशिदीवर बॉम्बहल्ला

दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यासाठी केली कारवाई

इस्रायलचा वेस्ट बँकमधील मशिदीवर बॉम्बहल्ला

इस्रायलच्या सैनिकांनी वेस्ट बँक येथील जेनिन भागातील अल-अंसार मशिदीमधील हमास आणि इस्लामिक जिहादी दहशतवाद्यांच्या परिसरावर हल्ला केला. या मशिदीचा वापर इस्रायली नागरिकांवर दहशतवादी हल्ल्याचा कट आखण्यासाठी आणि तो तडीस नेण्यासाठी एका कमांड सेंटरच्या रूपात केला जात होता, अशी माहिती मिळाल्याने इस्रायली संरक्षण दलाने ही कारवाई केली.

 

हमासविरोधातील लढाई इस्रायलने तीव्र केली आहे. त्यानुसार, दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. तसेच, गाझा शहरातील नागरिकांना दक्षिण गाझाच्या दिशेने स्थलांतरित होण्याचे आवाहन केले जात आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी अजूनही सुमारे २०० इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवले आहे. त्यांच्या सुटकेसाठी इस्रायलचे संरक्षण दल पुरेपूर प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जोरदार बॉम्बवर्षाव केला जात आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जाबिन नेतान्याहू यांनीही हवाई आणि जमिनीवरील माऱ्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याचे संकेत दिल्याने हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी बॉम्बवर्षाव सुरूच ठेवला आहे.

हे ही वाचा:

स्वीडनमध्ये इराकी व्यक्तीने इस्रायलच्या ध्वजाचे घेतले चुंबन!

जरांगेंचे २५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण!

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांची हुर्यो!

आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!

 

वेस्ट बँकमध्ये एका मशिदीतून आणखी दहशतवादी हल्ल्यांचा कट रचला जात असल्याची खबर मिळताच इस्रायलच्या सुरक्षा दलाने या मशिदीवरही हल्ला केला. इस्रायली विमानांनी संपूर्ण गाझा पट्टीमध्ये हमासच्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले. यामध्ये बहुमजली इमारतींमधील कमांड सेंटर आणि युद्ध केंद्राचाही समावेश आहे. तर, इस्रायली विमानांनी गाझामधील वर्दळीच्या परिसरातील काही घरांना लक्ष्य केले. त्यामध्ये किमान ५० जण ठार तर अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त पॅलिस्टिनी वैद्यकीय अधिकारी आणि हमासच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

Exit mobile version