द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी इस्लामी धर्मोपदेशक घाटकोपरमधून ताब्यात!

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार

द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी इस्लामी धर्मोपदेशक घाटकोपरमधून ताब्यात!

गुजरातमध्ये द्वेषपूर्ण भाषण दिल्याबद्दल घाटकोपर पोलिसांनी मुफ्ती सलमान अझारी या इस्लामी धर्मोपदेशकाला ताब्यात घेतल्याने घाटकोपर पोलिस ठाण्याच्या बाहेर रविवारी संध्याकाळी मोठा जमाव जमला होता.गुजरात पोलिस रविवारी शहरात आले होते. काही कायदेशीर कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यासाठी अझारी यांना ताब्यात घेऊन घाटकोपर पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. मात्र अझारी यांना ताब्यात घेतल्याचे समजताच हळूहळू पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमू लागला आणि त्यांच्या सुटकेची मागणी करू लागला.

पोलिसांनी सातत्याने आवाहन करूनही हा जमाव तेथून हटला नाही. मात्र या जमावामुळे रस्ता बंद झाला होता आणि वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांना जबरदस्तीने जमावाला तेथून बाहेर काढावे लागले. पोलिस सातत्याने लाऊडस्पीकरवरून जमावाला हा परिसर सोडून घरी जाण्याचे आवाहन करत होते. मात्र जमाव हटण्याचे नाव घेत नसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता आणि पोलिस ठाण्याजवळ संध्याकाळी उशिरा हळूहळू गर्दी जमा होऊ लागली. या धर्मोपदेशकाची सुटका करावी, अशी मागणी अझारी समर्थक करत होते. अझारी यांना अटक करण्यात आली की ते अजूनही ताब्यात आहेत, याबाबत रविवार रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही.

हे ही वाचा:

‘ग्रॅमी’वर भारतीयांची मोहोर; झाकीर हुसैन यांचा तीन तर, राकेश चौरासियांचा दोन ग्रॅमीने गौरव

जो खरा असेल तो ईडीच्या तपासाला सामोरे जाईल, केजरीवालांना गंभीरने लगावला टोला!

‘नव’ नामक वाघाच्या मृत्यूने लुधियाना टायगर सफारी पर्यटकांसाठी झाली बंद!

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेच्या लाभापोटी २००हुन अधिक जोडप्यांनी केला ‘बनावट’ विवाह!

या धर्मोपदेशकाने केलेल्या द्वेषपूर्ण भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुजरातमधील जुनागढ पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली. हे भाषण ३१ जानेवारी रोजी जुनागढ येथील खुल्या मैदानात आयोजित एका कार्यक्रमात देण्यात आले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अझारी आणि स्थानिक आयोजक मोहम्मद युसुफ मालेक आणि आझिकम हबिब ओडेदेरा यांना दोन धार्मिक गटांमध्ये तेढ निर्माण करणे आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस ठाण्याबाहेरील मुख्य रस्त्यावर अनेक तरुण विशेषतः अझारी याचे समर्थक जमले होते. अझारी तेव्हा पोलिस ठाण्यात होते. जुनागढमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांप्रकरणी गुजरात पोलिसांना त्यांना जुनागढ येथे न्यायचे होते. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळच्या पोलिस ठाण्यातून पोलिसांची अतिरिक्त कुमक आणि राखीव पोलिस दलाकडून कुमक मागवण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार झाल्याचेही समजते.

Exit mobile version