28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषन्यूटन, लेबनीझ यांच्यापेक्षा ‘माधव’ थोर होते!

न्यूटन, लेबनीझ यांच्यापेक्षा ‘माधव’ थोर होते!

इरीन्जलक्कुडा येथील एका श्रीकृष्ण मंदिरात बसून माधव ह्यांनी आपले अंतराळ निरीक्षण केल्याचे मानले जाते.

Google News Follow

Related

श्रीकांत पटवर्धन

प्राचीन भारतीय संस्कृती अतिशय प्रगत होती, आणि कित्येक वैज्ञानिक, गणिती, किंवा भौतिक शोधही भारतात फार पूर्वीच – म्हणजे पाश्चात्य जगात ते लागण्याआधीच – इथे भारतीय शास्त्रज्ञांनी लावले होते, या कल्पनेचा आधुनिक सुशिक्षित लोकांकडून नेहमीच उपहास केला जातो. भारताची वैज्ञानिक क्षेत्रातही विश्वगुरु होण्याची क्षमता, हाही असाच थट्टेचा विषय बनवला जातो. अशा विचाराच्या लोकांना “अंधभक्त” म्हणून हिणवले जाते. एकूण आधुनिक, विज्ञानामध्ये , गणितामध्ये आपले योगदान नगण्य, सगळी महत्वाची प्रगती काय ती पाश्चात्य, युरोपीय देशानीच केली, असे मानले जाते.

पण आता हे झपाट्याने बदलत आहे. विशेषतः गणिताच्या क्षेत्रात, एक नवे पुस्तक प्रकाशित झाले आहे, ज्याचे शीर्षक : “The Secret lives of Numbers: A Global History of Mathematics & Its Unsung Trailblazers” – पाश्चात्य जगात अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरत आहे. लेखक आहेत – केट कितागावा आणि टिमोथी रीवेल. प्राचीन ग्रीक शास्त्रज्ञ आणि विचारवंताना आधुनिक गणिताचे आद्य प्रणेते, अध्वर्यू म्हणून नेहमीच मानाचे स्थान देऊन गौरविण्यात आले; परंतु “अलिकडे असे लक्षात येत आहे, की या क्षेत्रातील एकूण वैश्विक ज्ञानसंपदेतील बराच भाग प्राचीन भारत आणि चीन अशा देशांतूनही आलेला आहे.” ( कितागावा आणि रीवेल हे लेखकद्वय आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात.)

आधुनिक गणितातील अत्यंत महत्वाचा / पायाभूत भाग म्हणजे कॅलकुलस (Calculus). अठराव्या शतकामध्ये ह्या गणित शाखेचा पाया रचण्याचे श्रेय सर आयझाक न्यूटन आणि गोट्फ्रिड लेबनीझ ह्यापैकी कोणाला द्यावे, यावरून बरेच वाद होते. शेवटी सर्वानुमते असे मानले गेले, की कॅलकुलस मधील `डीफरेन्शियल कॅलकुलस` या भागाच्या पायाचे श्रेय न्यूटन याला तर `इंटिग्रल कॅलकुलस` या भागाचा पाया घालण्याचे श्रेय गोट्फ्रिड लेबनीझ याला दिले जावे. पण आता तसे नाही. हे दोघे लेखक (कितागावा व रीवेल) अत्यंत मेहनतीने केरळमध्ये इ.स. १३४० मध्ये जन्मलेल्या “माधव” नावाच्या थोर गणिततज्ज्ञावर संशोधन करून अशा निष्कर्षावर पोचले आहेत, की कॅलकुलस ह्या गणित शाखेचे पायाभूत ज्ञान माधव यांना असल्याखेरीज त्यांनी ज्या गणिती सूत्रांचे, सिरीजचे शोध लावले, ते लावले जाऊच शकत नाहीत. याचा अर्थ असा, की अठराव्या शतकाच्या आधीच – चौदाव्या शतकातच कॅलकुलस चे ज्ञान इथे, भारतात होते !

अलीकडच्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर माधव यांच्या गणिती संशोधनावर प्रकाश टाकण्याचे कार्य केले जात असून, काही गणिती सिद्धांतांचे नव्याने `माधव-लेबनीझ` सिद्धांत असे नामकरणही केले गेले आहे. गेल्या बारा वर्षांमध्ये केरळमध्ये काही शिक्षण तज्ज्ञ माधव यांच्या भूर्जपत्रे, तालपत्रे यांवरील लेखनाचे संशोधन करून, ती मौल्यवान सामग्री भावी पिढ्यांसाठी जतन करून ठेवण्याचे कार्य करत आहेत. यामध्ये लिटी चाको नावाचे सेंट जोसेफ कॉलेजातील मल्याळम अध्यापक, तसेच मंगलाम्मल नावाचे गणितज्ञ असून,ते म्हणतात, की माधव यांच्या कार्याचे, लिखाणाचे योग्य संशोधन व मूल्यमापन होण्यासाठी अधिक मोठ्या टीमची आवश्यकता आहे, ज्यामध्ये गणित, खगोलशास्त्र व संस्कृतचे जाणकार असणे गरजेचे आहे. माधव यांनी “पाय” (वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांचे गुणोत्तर) ची अचूक किंमत दहा डेसिमल पर्यंत शोधून काढली होती. ही किंमत शोधण्यासाठी माधव यांनी प्रथमच Infinite Series ची पद्धत वापरली; (जी सध्याच्या Taylor सिरीजशी मिळतीजुळती आहे.) त्याआधी Finite Series ची पद्धत वापरत असत. त्याचप्रमाणे त्रिकोणमितीतील Sin, Cos, Tan यांची टेबल्स निर्धारित करण्यासाठी त्यांनी “माधव प्रमेय” शोधून त्याचा यशस्वी वापर केला. हे कार्य त्यांनी न्यूटन, लेबनीझ, कोपर्निकस यांच्या कैक वर्षे आधी केले.

हे ही वाचा:

बहराइचमधील लांडग्यांना पकडण्यासाठी ‘टेडी बिअर’चे जाळे !

सिंगापूरमध्ये पंतप्रधान मोदींनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद!

रामगिरी महाराजांना ‘सर तन से जुदा’ची धमकी देणाऱ्या मुहम्मद सादला ठोकल्या बेड्या

मोदींच्या दौऱ्यानंतर आता चेन्नई ते ब्रुनेई…

माधव यांनी एकूण ८ ग्रंथ लिहिल्याचे मानले जाते, त्यातील फक्त ५ च सध्या उपलब्ध असून, उर्वरित ३ अजूनही सापडू शकलेले नाहीत. अलीकडेच संशोधकांना इरीन्जलक्कुडा गावी एका पुराणवस्तू विक्रेत्याकडे माधव यांचे एक हस्तलिखित (भूर्ज/ताल पत्रांवरील) सापडले. ते माधव यांचे खगोलशास्त्र विषयक भाष्य आहे. इरीन्जलक्कुडा येथील एका श्रीकृष्ण मंदिरात बसून माधव ह्यांनी आपले अंतराळ निरीक्षण केल्याचे मानले जाते.

“The Crest of the Peacock: Non-Europian Roots of Mathematics” जॉर्ज जोसेफ यांनी लिहिलेले व प्रिन्स्टन युनिवर्सिटीने प्रकाशित केलेले आणखी एक पुस्तक. या पुस्तकात असे मत मांडण्यात आले आहे, की भारतीयांचे गणित विषयक ज्ञान (माधव यांच्या सिद्धान्तांसह) बहुधा पाश्चात्य देशांतून केरळात आलेल्या जेसुइट मिशनऱ्यांनी युरोपात पोहोचवले असावे. जोसेफ यांनी अशी अनेक उदाहरणे दिली आहेत, ज्यांत जेसुइट मिशनऱ्यांनी केरळचे राजघराणे, तसेच केरळीयन ब्राह्मण यांच्याकडून मूळ संस्कृत हस्तलिखितांचे युरोपीय भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी मदत घेतली आहे. हे ज्ञानसंपादनाचे (की ज्ञानचौर्याचे ?) कार्य केरळमध्ये जेसुइट मिशनऱ्यांच्या आगमनापासूनच सुरु झाले. संस्कृत किंवा स्थानिक (मल्याळी) भाषांमध्ये उपलब्ध असलेले शास्त्रीय ज्ञान युरोपात पाठवले जाण्यापूर्वी युरोपीय भाषांमध्ये
भाषांतरित केले जात असे, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे Garcia da Orta यांचा इ.स. १५६३ मध्ये गोव्यात प्रसिद्ध झालेला लोकप्रिय ग्रंथ. असे इतरही बरेच ग्रंथ असू शकतात, पण ते दुर्मिळ असून उपलब्ध होऊ शकत नाहीत. आणि यामध्ये कदाचित युरोपीय देशांच्या भाषिक/राष्ट्रीय अस्मितेचा भाग असू शकतो,हे जोसेफ आवर्जून नमूद करतात. (ज्या शास्त्रीय ज्ञानाचे श्रेय आजवर युरोपीय देशांनाच दिले गेले, त्या ज्ञानाचा मूळ स्रोत भारतीय आहे, हे कसे कबूल करणार ?!)

आपल्याकडे मुळात गरज आहे, ती भूर्जपत्रे / तालपत्रांवर कोरलेली हस्तलिखिते व्यवस्थित जतन करून, त्यावर संशोधन करण्याची. पाश्चात्य देशांमध्ये पुराणवस्तू संशोधन, संवर्धन व जतन करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. माधव यांच्यासंबंधी संशोधन करणाऱ्या टीममधील लिटी चाको हे म्हणतात, की त्यांची टीम भारत सरकारच्या सहकार्याने केरळच्या गणित आणि खगोलशास्त्र विषयक ज्ञानाशी संबंधित भूर्जपत्रे / तालपत्रांवरील हस्तलिखिते (मुख्यतः माधव यांची) जर्मनी, वातिकन व लिस्बन येथून परत मिळवण्याचा प्रयत्न करील. चाको यांच्यामते जर्मनी, व्हॅटिकन आणि लिस्बन येथील मोठ्या ग्रंथालयांमध्ये अशी हस्तलिखिते, (विशेषतः गणित व खगोलशास्त्रविषयक) मोठ्या प्रमाणात आहेत. अशी हस्तलिखिते युरोपीय देशांतून परत मिळवल्यास, भारताला विज्ञान क्षेत्रातील त्याच्या प्राचीन कामगिरीचे यथोचित श्रेय मिळेलच, पण त्याचबरोबर कदाचित पाश्चात्य देशांच्या `ज्ञानचौर्या`वर प्रकाश पडेल. देशातून चुकीच्या मार्गाने (Smuggling) परदेशात गेलेल्या आपल्या दुर्मिळ वस्तू परत मिळवण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच भर दिला आहे. केरळीय शास्त्रज्ञ माधव यांची हस्तलिखिते निश्चितच अमूल्य आहेत. ती परत मिळवावीच लागतील.

श्रीकांत पटवर्धन

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा