राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या महायुती सरकारमध्ये समावेशानंतर सरकार अधिक भक्कम झाले आहे, असे मानले जात आहे. परंतु उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री पदावर विराजमान होऊन सरकार भक्कम करणाऱ्या अजित पवारांनी स्वत:बाबत अनिश्चितता व्यक्त करून अनेकांना धक्का दिलेला आहे.
‘आज माझ्याकडे अर्थमंत्री पद आहे, उद्या टिकेल की नाही माहीत नाही’, असे विधान त्यांनी केलेले आहे. राजकारण निसरडे आणि अनिश्चित असते. कधी कोणाचा चौका लागेल, कधी कोणाची विकेट पडेल काही सांगता येत नाही. राजकारणात कशाचीच शाश्वती नाही, हा अजितदादांच्या विधानाचा अर्थ. तरीही त्यात आणखी काही दडलंय का? याची चाचपणी सुरू आहे. अजित पवार हे अघळपघळ बोलणारे नेते नाहीत. मोजकं आणि नेमकं बोलणं हा त्यांचा पिंड आहे, त्यामुळे असेल कदाचित.
गणेशोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी मुंबईत आले होते. त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही उपस्थित होते. अजित पवारांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. बारामतीतील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण अमित शहा यांच्या मुंबई भेटीच्या वेळ अनुपस्थित होतो, असे कारण अजित पवारांनी दिलेले आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे राजकीय वजन आणि वचक मोठा आहे. अनेक बडे नेते अमित शहा यांना भेटण्यासाठी सर्व प्रकारच्या खटपट-लटपटी करत असताना अजित पवार त्यांची भेट टाळून बारामतीतील कार्यक्रमांसाठी निघून जातात हे पटत नाही.
भाजपाला राज्यात ४० पेक्षा जास्त जागांचा आकडा गाठायचा आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी अजित पवार सोबत हवे असे भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाला वाटले म्हणून अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले. एकनाथ शिंदे यांनी ज्याप्रमाणे शिवसेना फोडली तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसची शकले करून सत्तेत आले. राष्ट्रवादीतील फूट ही शरद पवारांची रणनीती की दुरावस्था ही बाब अजून स्पष्ट झालेली नाही. परंतु गेल्या काही दिवसातील चित्र पाहिले तर गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनी अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. दोघांनी राज्य सहकारी बँके घोटाळ्याची चौकशी करण्याचे आव्हान केंद्र सरकारला केलेले आहे.
संसदेत या दोन्ही घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर शरसंधान केले होते. अजित पवार भाजपासोबत आल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी चौकशीची मागणी करून एकाच वेळी पंतप्रधान आणि अजित पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रय़त्न केलेला आहे. सिंचन घोटाळ्याची चौकशी करून याप्रकरणातील सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी शरद पवार यांनी केली होती. सुप्रिया सुळे यांनीही लोकसभेत हीच मागणी करून अजित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
हे ही वाचा:
मोदी सरकारला गेल्या ९ वर्षातील कामाचे १० पैकी आठ गुण
भारतीय वायुदलात ‘सी-२९५’ वाहतूक विमान दाखल!
ओवैसींचे राहुल गांधींना हैदराबादमधून आपल्याविरोधात लढण्याचे आव्हान !
किरीट सोमय्यांना कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
अजित पवार भाजपासोबत गेले आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे तुर्तास इंडी आघाडी सोबत आहेत. परंतु पवारांनी भाजपापर्यंत घेऊन जाणारा अदाणी मार्ग मात्र खुला ठेवलेला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वारंवार हल्ल्यानंतरही शरद पवार उद्योगपती गौतम अदाणींच्या संपर्कात आहेत. नुकतेच गौतम अदाणी यांच्या निमंत्रणावरून गुजरातेतील वसना, चाचरवाडी येथे त्यांच्या एका प्रकल्पाचे उद्घाटन करायला गेले होते.
पवारांचे हे अदाणी प्रेम अनेकांना अस्वस्थ करते आहे. जेव्हा जेव्हा अदाणी आणि पवारांची गाठभेट होते तेव्हा इंडी आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते कोड्यात पडतात. पवार नेमके कुठे आहेत? असा प्रश्न त्यांना पडतो. हे ठाऊक असूनही पवार अदाणींसोबत संबंध पातळ करायला तयार नाहीत. अदाणी-पवार एकत्र आल्यावर ते भाजपाचा एखादा संदेश तर घेऊन आलेले नाहीत ना, असा संशय काँग्रेस नेत्यांना येत असतो. अजित पवार भाजपासोबत गेलेले आहेत. शरद पवारांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे.
एका बाजूला राज्य सहकारी बँक घोटाळा आणि सिंचन घोटाळ्यावरून शरद पवार आणि सुप्रिया सुळे अजित पवारांची कोंडी करून पाहातायत. दुसऱ्या बाजूला अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर प्रथमच भाजपा नेत्याने अजित पवारांवर कठोर हल्ला चढवलेला आहे. गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांचा उल्लेख लबाड लांडग्याचे, लबाड पिल्लू अशा शेलक्या शब्दांत केले आहे. अजित पवारांनी प़डळकरांच्याविरोधात कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु स्वत:च्या अखत्यारीत असलेल्या अर्थमंत्री पदाबाबत मात्र त्यांनी केलेल्या विधानाची चर्चा होते आहे.
राजकारणात पदं येत-जात असतात, अर्थमंत्री पद किंवा सत्तेतील सहभाग उरणार नाही तेव्हाही अजित पवार म्हणून माझे अस्तित्व असेल, असे शरद पवारांना सांगण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे का? की भाजपाने आपल्याला गृहीत धरू नये, असे त्यांना सुचवायचे आहे?
कदाचित यापैकी कोणताही उद्देश नसेल. बोलण्याच्या ओघात बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात त्यापैकी हे विधान असेल. पद कुणालाच कायम स्वरुपी चिकटलेले नसले तरी अजित पवार आतापर्यंत काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिले. हे पद त्यांना चिकटून राहिले ही बाब नाकारता कशी येईल? राजकारणात सतत काही तरी नाट्यपूर्ण घडण्याचा काळ दीड वर्षापूर्वी संपला. सपक झालेल्या राजकारणाला अजित पवारांच्या विधानाने तडका देण्याचे काम मात्र केले आहे हे नक्की.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)