मजल्यावर मजले सहा…मालवणीतला अनधिकृत प्रताप पाहा

मजल्यावर मजले सहा…मालवणीतला अनधिकृत प्रताप पाहा

मुंबईच्या पहिल्या धुवाधार पावसात मालाड जवळच्या मालवणी भागात इमारत कोसळून जीवितहानी झाल्याची घटना समोर आली. या दुर्घटनेनंतर अनधिकृत इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मालवणी भागात अशा अनेक अनधिकृत इमारती उभ्या असून त्यावर महापालिका कारवाई करताना दिसत नाहीये. पण जिवाच्या भीतीने तिथले स्थानिक नागरिकच आता अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांवर दबाव टाकताना दिसत आहेत.

शनिवार, मालवणीतील एका अजब अनधिकृत बांधकामाचा फोटो आणि व्हिडिओ ‘न्यूज डंका’ च्या हाती लागले. मालवणीतील प्लॉट नंबर ३०, गेट नंबर सात येथे हिना हॉटेल जवळ हे अनधिकृत बांधकाम असल्याचे समजते. इथे एका घरमालकाने आपल्या घरावर अनधिकृतपणे एक नाही दोन नाही तर तब्बल पाच ते सहा मजले चढवल्याचे या फोटोत दिसत आहेत. स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिथे खालच्या मजल्यावर त्या घराचा मालक राहत असून वरच्या मजल्यांवर भाडेकरू ठेवण्यात आले आहेत.

पण नुकत्याच मालवणीमध्ये घडलेल्या इमारत दुर्घटनेमुळे या अनधिकृत बांधकामाच्या आसपास राहणारे नागरिक भीतीने सतर्क झाले आहेत. त्यांनी या घर मालकावर हे बांधकाम त्वरित पाडावे यासाठी दबाव आणायला सुरुवात केली आहे. त्यानुसार हे बांधकाम पाडण्यासाठी हा घरमालक तयार झाल्याचेही समजते. पण जे बांधकाम अनधिकृत आहे हे कोणीही सामान्य माणूस बघून सांगू शकेल अशा या बांधकामावर महापालिकेकडून कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अशी अनेक अनधिकृत बांधकामे मालवणी भागात सर्रास होत असून यातले अनेक जण हे विशिष्ट धर्माचे लोक असतात अशीही कुजबुज मालवणीमध्ये ऐकू येते. या अनधिकृत बांधकामांमध्ये विशिष्ट धर्माच्या प्रार्थना स्थळांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या बांधकामांना स्थानिक राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचेही म्हटले जात आहे.

Exit mobile version