28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषउद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणारा सर्व्हे येणार का?

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणारा सर्व्हे येणार का?

Google News Follow

Related

काही दिवसांपूर्वी राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रांत एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात आली होती आणि त्याखालोखाल देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली गेली होती. त्यावरून महाराष्ट्रात गदारोळ झाला. या दोन्ही नेत्यांवर टीका झाली. त्यांच्यात कसे मतभेद आहेत, बेबनाव आहे, याचे चित्र उभे केले गेले. सोमवारी आणखी एक सर्व्हे प्रसिद्ध झाला. न्यूज अरेना इंडिया या संस्थेने हा सर्व्हे प्रसिद्ध केला त्यात मात्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात आली. तर एकनाथ शिंदे यांना चौथ्या क्रमांकाची मते देण्यात आली. अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना प्रत्येकी २१ टक्के मत देऊन फडणवीसांच्या खालोखाल पसंती असल्याचे दाखविण्यात आले. तर उद्धव ठाकरे हे ९ टक्के मतांसह पाचव्या स्थानावर होते. त्यावरूनही चर्चा झाली. या दोन्ही सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री म्हणून म्हणा किंवा पक्ष म्हणून म्हणा उद्धव ठाकरे यांचे किंवा त्यांच्या पक्षाचे कुठेही नामोनिशाण नाही. अर्थात, हे सर्व्हे सगळे आकडे खरेच सांगत असतात असे अजिबात नाही. त्यामुळे सगळे काही या सर्व्हेनुसारच घडेल अशी शक्यता १०० टक्के आहे असेही कुणी म्हणू शकत नाही.

 

मात्र सर्व्हे एका बाजुला ठेवले तरी वास्तव मात्र नाकारता येणार नाही. सर्व्हेतून राजकारण करता येईल, प्रतिक्रियांचा पाऊस पाडता येईल पण वास्तवात बदल करता येणार नाही.

 

न्यूज अरेनाने जाहीर केलेल्या सर्व्हेत उद्धव ठाकरे यांना पाचवा क्रमांक देण्यात आला आहे, ती अतिशयोक्ती आहे असे कुणी म्हटले तरी त्यात तथ्य आहे हे नाकारता येणार नाही. गेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असोत की जिल्हापरिषदेच्या त्यात भाजपाने एक पक्ष म्हणून सर्वाधिक यश मिळविले पण उद्धव ठाकरे यांच्या गटाला पाचवा किंवा सहावा क्रमांक मिळाला होता. तो काही सर्व्हे नव्हता, तर ते लोकांनी केलेले मतदान होते. पण तेव्हा महाविकास आघाडीचे यश म्हणून तो कौल दडवण्याचा प्रयत्न झाला. तरीही उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळत असलेला प्रतिसाद त्यातून स्पष्ट दिसत होता.

 

एवढेच नव्हे तर आज एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे ४० आमदार बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे १५ आमदारच शिल्लक आहेत. खासदारांचीही संख्या त्यापेक्षा कमी आहे. मग अशा परिस्थितीत कमकुवत झालेल्या उद्धव ठाकरेंना निवडणुकीत यश मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल. मुख्यमंत्री होण्यासाठी तेवढी ताकद याघडीला उद्धव ठाकरे यांच्यापाशी नाही. हे वास्तव लपवता येणार नाही. त्यांच्या तुलनेत शिंदे यांच्याकडे मात्र आमदारांची, खासदारांची मोठी संख्या आहे. त्यांना आगामी निवडणुकात कसा प्रतिसाद लोक देतात हे येणारा काळ ठरवेलच. पण आकड्यांच्या बाबतीत ते निश्चितपणे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वरचढ आहेत.

 

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या या अवस्थेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचे ठरविले तर उद्धव ठाकरेंना किती जागा दिल्या जातील याचे चित्र आजच दिसू लागले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष उद्धव यांच्यासाठी सर्वाधिक जागा देण्यासाठी नक्कीच तयार होणार नाहीत. ज्यांच्याकडे सर्वाधिक आमदार त्यांना सर्वाधिक जागा असाच फॉर्म्युला अमलात आणला जाईल, त्यामुळे उद्धव यांना तेवढ्या जागा मिळतील अशी शक्यता नाही. शिवाय, जरी वेगवेगळ्या निवडणुका लढविल्या तरी उद्धव यांच्यापाशी आधीच्या ताकदीने त्या लढविण्याची क्षमता राहिलेली नाही. एकूणच त्यांची सगळीकडून कोंडी होणार आहे.

हे ही वाचा:

भोपाळमध्ये तरुणाला पट्टा अडकवून भुंकायला लावणाऱ्यांची घरे जमीनदोस्त

देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान हवेत!

सिक्कीममध्ये पावसाचा तांडव, ३०० पर्यटकांना बाहेर काढण्यात यश

मनीषा कायंदेंनी दाखवले सुषमा अंधारेंकडे बोट?

न्यूज अरेना इंडियाने जो सर्व्हे प्रसिद्ध केला आहे, त्यातही भाजपाला अव्वल स्थान दिले आहे. त्यांना १२९ ते १३५ जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. ते अतिशयोक्ती जरी मानले तरी गेल्या दोन निवडणुकात भाजपाला शंभरपेक्षा अधिक जागा मिळालेल्या आहेत, हे लक्षात घेता ते अशक्यही वाटत नाही. पण याच सर्व्हेत राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा देण्यात आल्या आहेत, काँग्रेसचीही स्थिती सुधारेल असे संकेत दिले आहेत. पण उद्धव याना मात्र त्या तुलनेत जागा देण्यात आलेल्या नाहीत. हे वास्तव नाकारता येणार नाही.

 

गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी बॅनर लावून प्रत्येकजण आपल्या मनातील मुख्यमंत्री कोण हे सांगतो आहे. त्यात अजित पवारांना कुणी भावी मुख्यमंत्री म्हणत आहे तर कुणी जयंत पाटलांना. कुणाला सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हाव्या असे वाटते. अगदी कुणीतरी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असेही म्हटले आहे. पण या सगळ्यात उद्धव ठाकरे भावी मुख्यमंत्री म्हणून कुणीही म्हणत नाही.

 

गेल्या महिन्यापर्यंत वज्रमूठ सभा, महाप्रबोधन यात्रांचे आयोजन होत होते. त्यात तिन्ही पक्षांचे नेते एकत्र दिसत होते. पण नंतर या सभा बंद करण्यात आल्या. त्याला कारण ठरले असावे ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सभा का घ्याव्यात असा प्रश्न इतर दोन पक्षांच्या नेत्यांच्या मनात आला असावा. मग अशा परिस्थितीत कुणीही उद्धव ठाकरेंच्या बाजूने भविष्यातील मुख्यमंत्री म्हणून कौल दिलेला नसताना त्यांचे नाव अशा सर्व्हेंमध्ये प्रथम पसंतीत ठेवण्याचे धाडस तरी कोण करणार ? त्यामुळे आगामी काळात असा एखादा सर्व्हे तयार होईल का आणि त्यात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळेल का, याची प्रतीक्षा आहे.

 

 

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा