इर्शाळवाडी गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २० मृतदेह हाती लागले आहेत. घटनास्थळाची पाहणी करत अनेक तास ठाण मांडून सर्व सूत्रं हाताळणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदन दिले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळावरचा थरारक आणि मन हेलावून टाकणारा आपला अनुभव सर्वांसमोर मांडला. इर्शाळवाडी हे गाव किती दुर्गम ठिकाणी आणि तिकडे जाण्याचा रस्ता किती कठीण होता, हे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
चौक-मानवली ग्राम पंचायतीच्या हद्दीतील इर्शाळवाडी ही आदिवासी वस्ती. हा भाग दुर्गम असल्यामुळे इथे मदतकार्य पोहोचवणे सुद्धा कठीण होते. परंतु, दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक यंत्रणा तातडीने कार्यरत झाल्या. आजूबाजूच्या स्वयंसेवी संस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफची पथके तिथे दाखल झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी, मजूर, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर करत आहेत.अशा या नैसर्गिक दुर्घटनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात आपला सहभाग नोंदवला. इर्शाळवाडी गावाची स्थिती पाहून महाराष्ट्र स्तब्ध झाला.एकनाथ शिंदे यांनीही स्वतः अनुभवलेला प्रसंग जनतेसमोर सांगितला.
ते म्हणाले, याठिकाणी सर्वप्रथम पोहोचणाऱ्या गिरीश महाजन आणि आमदार महेश बालदी यांचे खरं तर कौतुक केले पाहिजे. इर्शाळवाडी गाव प्रचंड उंचीवर होते. गावाकडे जाणारा रस्ता चढताना एका पॉईंटला मलाही या गोष्टीची जाणीव झाली होती. मी पहाटे इर्शाळवाडी गावाच्या पायथ्याशी पोहोचलो. रात्रभर मी गिरीश महाजन यांच्या संपर्कात होतो. आपण गेल्यामुळे यंत्रणा हलते, अलर्ट होते. पण इर्शाळवाडी गावाकडे जाणारा रस्ता चढणीचा आहे. तिकडे जाण्याची इच्छा असल्यामुळे मी चढण चढायला सुरुवात केली.
हे ही वाचा:
पुरातत्त्व खात्याला ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्याची परवानगी
मुस्लिमांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १४.२ टक्के; अर्थात २० कोटी
ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा व्हॉट्सऍपवर तक्रार
नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार अजित पवारांच्या पाठीशी
पण एका स्टेजला जाऊन मलाही हे गाव किती उंचीवर आहे आणि रस्ता किती चढणीचा आहे, याची जाणीव झाली. याठिकाणची परिस्थिती एकूणच भयानक होती. मी रस्ता चढताना विचार केला की, जी लोकं वरती साहित्य घेऊन जात आहेत, त्यांना सलामच केला पाहिजे. कारण हा रस्ता चढणे अत्यंत कठीण होते. तिथल्या मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश न बघवण्यासारखा होता. हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग होता. आपल्याकडे सर्व यंत्रणा असूनही त्या वापरु शकलो नाही, याची खंत वाटते. पण आपण वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले.
इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली तेव्हा आश्रमशाळेतील काही विद्यार्थी खेळत होते. त्यांना आवाज आला आणि ते त्याठिकाणी पळाले. यानंतर त्यांनी बाकी लोकांना कळवले. गावातील काही लोक मासेमारीसाठी, काही लोक भात शेतीसाठी बाहेर गेले होते. आणखी काही लोक बाहेर असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत २० मृतदेह हाती लागले आहेत. मी मृतांच्या नातेवाईकांना भेटलो. त्यांचा आक्रोश सुरु होता, सगळी परिस्थिती खूप अडचणीची होती. मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावणे जिकिरीचे काम होते. एकीकडे एनडीआरएफचे जवान ढिगारा उपसण्याचे काम करत होते. दुसऱ्या बाजुला मृतांच्या नातेवाईकांशी बोलून अंत्यविधी करायचा ठरला. त्यासाठी काही लोक वरतीच खड्डे खणत होते. हे दृश्य अत्यंत विदारक होते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सिडकोमार्फत नवी घरं बांधून देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत घरं गमावलेल्या लोकांच्या पुनर्वसनासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. इर्शाळवाडीच्या खालच्या भागात पायथ्याला कंटेनर्समध्ये ४७ कुटुंबांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी ६० कंटेनर्स येतील, त्यापैकी ३० कंटेनर्स येथे पोहोचले आहेत. गावकऱ्यांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत या कंटेनर्समध्ये त्यांची सगळी व्यवस्था करण्यात येईल. यामध्ये त्यांना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा आहेत. तसेच आगामी काळात इर्शाळवाडीतील गावकऱ्यांसाठी जागा निश्चित झाल्यानंतर सिडकोमार्फत तात्काळ घरे बांधून देण्यात येतील. जागा मिळाल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करावी, अशा सूचना सिडकोला देण्यात आल्या आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.