‘दर्द से हम दर्द ट्रस्ट’च्या वतीने शनिवारी चर्चगेटच्या बहाई सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विधी विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, नवोदित वकील हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाला आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी समीर वानखेडे यांनी नार्को दहशतवादाच्या मुद्द्यावर भाष्य करत या समस्येचे गांभीर्य उपस्थितांच्या लक्षात आणून दिले.
यावेळी बोलताना आयआरएस अधिकारी समीर वानखेडे म्हणाले की, सध्या देशासमोर दोन महत्त्वाच्या समस्या आहेत. या समस्या म्हणजे दहशतवाद आणि नार्को दहशतवाद. सुदैवाने विद्यमान पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या नेतृत्वात देश दहशतवादाच्या संकटाचा सामना उत्तम करत असून यात ताबा मिळवण्यात यशही आले आहे. पण, दुसरी समस्या नार्को दहशतवाद म्हणजे नार्कोटिक्स आणि दहशतवाद यांचा एकत्र सामना करणे. ही समस्या देशाला भेडसावत असून आज आपण यावर बोललो नाही तर आणखी १० वर्षांनी गोष्टी हाताबाहेर गेलेल्या असतील. त्यामुळे हे थांबवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असं मत समीर वानखेडे यांनी व्यक्त केले.
आजच्या पिढीला अमलीपदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. अमलीपदार्थांच्या आड दडलेला नार्को दहशतवाद हा देशासाठी धोकादायक असल्याचे मत समीर वानखेडे यांनी व्यक्त केले. परदेशातून चोरट्या मार्गाने अमलीपदार्थ आणून त्याची विक्री देशात केली जाते. यावेळी अशा तस्करावर संबंधित यंत्रणा कारवाई करतात; कारवाई करताना अधिकाऱ्यांना अडचणींना कसे सामोरे जावे लागते याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली. भारतात चोरट्या मार्गाने येणारे अमलीपदार्थ ही चिंतेची बाब आहे. समुद्र, हवाई मार्गे तस्कर हे अमली पदार्थाची तस्करी करतात. प्रत्येक वेळी तस्कर हे त्याची गुन्ह्याची पद्धत बदलत असतात. अशा कॅरिअरवर केंद्रीय यंत्रणा या कारवाई करतात, असे समीर वानखेडे म्हणाले.
समीर वानखेडे यांनी एनडीपीएस कायद्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. एनडीपीएस कायद्यानुसार कोणती कलम लावली जातात. त्या कलमात काय शिक्षा आहे या बाबत देखील मार्गदर्शन केले. युरोपियन आणि आखाती देशातून येणारे कॅरिअर हे शरीरातून ड्रग कसे घेऊन येतात, ते ड्रग रुग्णालयात नेऊन कसे काढले जाते, पोटातून डॉक्टर ड्रग काढतात, कित्येकदा कॅरिअर हे सहकार्य करत नाही, अशावेळी काय अडचणी येतात याची माहिती देण्यात आली.
हे ही वाचा:
साडेचार महिने मी फक्त एकदाच जेवतो!
औरंग्याची खुलताबाद येथील कबर “राष्ट्रीय वारसा” म्हणून जतन करायची का ?
भारतीय संरक्षण उद्योगाची गरुडभरारी
नाय नो नेव्हर! दिल्ली टीमवर मानसिक दबाव नाही…
तपास यंत्रणा या अमलीपदार्थाचे व्यसन करणारा आणि अमलीपदार्थाची तस्करी करणारा असा भेदभाव करत नाही. दोघांवरही त्या त्या कलमाखाली कारवाई केली जाते. तसेच छोट्या वस्त्यांमध्ये व्यसन करणारे असो किंवा उच्चभ्रू सोसायटी मध्ये राहणारे असो त्याच्यावर कारवाई केलीच जाते. अमलीपदार्थाचे व्यसन केल्याने आरोग्य धोक्यात येते. सध्या काही जण अमलीपदार्थ व्यसनाबाबत गैरसमज पसरवत आहेत. ते देखील थांबवणे गरजेचे असल्याचे मत वानखेडे यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या वतीने ऍड. सुनीता प्रकाश साळशिंगीकर- खंडाळे यांनी समीर वानखेडे यांचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. विवेक निषाद यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍड. नितीन हजारे यांनी केले.