इराणने शनिवारी केलेले ड्रोन हल्ले यशस्वीपणे परतवून लावणाऱ्या मोहिमेला इस्रायलने ‘आयर्न शील्ड’ असे नाव दिले आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) असे सोमवारी जाहीर केले.१ एप्रिल रोजी इस्रायलने सिरीयाची राजधानी दमास्कसमधील इराणच्या दूतावासावर हल्ला केला होता. इराणने यासाठी इस्रायलला जबाबदार ठरवले होते. या हल्ल्यात इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांसह १६ जण ठार झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणने पहिल्यांदाच थेट इस्रायलवर लष्करी कारवाई केली.
इराणने शनिवारी १७० ड्रोन आणि १५० क्षेपणास्त्रे डागली. त्यातील ३० ही क्रूझ आणि १२० ही आंतरखंडीय क्षेपणास्त्रे होती. त्यातील ९९ टक्के क्षेपणास्त्रे इस्रायलच्या हवाई संरक्षण दलाने आणि लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या लष्कराच्या मदतीने निकामी केली.पाश्चिमात्य देशांनी इस्रायलला पाठिंबा देऊन इराणचा निषेध केला आहे. तर, इस्रायलने कोणतीही लष्करी कारवाई केल्यास त्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणने दिला आहे.
हे ही वाचा:
धुळ्यात डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीवर दगडफेक!
ओडिशामध्ये पुलावरून बस कोसळून अपघात; पाच ठार
दिनेश कार्तिकच्या ८३ धावा ठरल्या अपुऱ्या
‘निवडणूक रोखे मागे घेतल्याने प्रत्येकाला पश्चात्ताप होईल’
द टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखाली युद्ध मंत्रिमंडळाची बैठक झाली असून ते कदाचित सोमवारी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. इराणला योग्य तो संदेश देण्यासाठी स्पष्टपणे आणि जोरदार हल्ला करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला गेल्याचे समजते. इराणने आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा वापर केल्याने इस्रायलकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नसल्याचे इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांना सांगितले आहे.
‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या मते, सायबर हल्ले, इराणच्या तेल पायाभूत सुविधांसारख्या सरकारी मालकीच्या ठिकाणांना लक्ष्य केले जाईल. तेहरानच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित कर्मचारी आणि पायाभूत सुविधांवर हल्लेही केले जातील. तसेच, इराणच्या आण्विक स्थळांनाही लक्ष्य केले जाईल. अशा मोहिमांसाठी अमेरिकेचे समर्थन आणि निधी दोन्ही आवश्यक असणार आहेत.