राज्याच्या पोलीस महासंचालक पदी पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी रश्मी शुक्ला यांच्याकडून हा पदभार काढून घेण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही बदली करण्यात आली होती. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी महासंचालक पदी संजय कुमार वर्मा यांना पदभार देण्यात आला होता. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याने पुन्हा रश्मी शुक्ला यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार देण्यात आला आहे.
रश्मी शुक्ला या मागील काही वर्षांपासून वादग्रस्त अधिकारी ठरल्या होत्या. राजकीय विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून रश्मी शुक्ला यांना पदावरून हटविण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. निवडणुक आयोगाने बदलीचे निर्देश देऊन ५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस महासंचालक पदाचा पदभार सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांच्याकडे देण्यात यावा असे आदेश दिले होते. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ देऊन त्यांना पोलीस महासंचालक पदावर ठेवण्यात आले होते. मात्र, निवडणुकीच्या काळात रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. यानंतर आता रश्मी शुक्ला यांनी पुन्हा एकदा पोलीस महासंचालक पदाचा कारभार स्वीकारला आहे.
IPS Rashmi Shukla has been re-appointed as DGP of Maharashtra. pic.twitter.com/ZovW3qsxjE
— ANI (@ANI) November 25, 2024
रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक. त्यांनी सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्र प्रमुख म्हणूनही काम केले. याशिवाय त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.
हे ही वाचा :
बांगलादेशात चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात निदर्शन करणाऱ्या हिंदू समुदायावर अज्ञातांकडून हल्ला
विधानसभा निवडणुकीत ८५% उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; १० वर्षांतील सर्वाधिक ३.५ कोटी रुपये जप्त
थोडी लाज शिल्लक असेल तर तोंड काळे करा…
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारे साधू चिन्मय प्रभू यांना अटक
राज्यात फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांचे नाव चर्चेत होते. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. या प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्री आणि नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यावेळी रश्मी शुक्ला राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांच्यावर संजय राऊत, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.