आयपीएल २०२२ च्या हंगामात ‘हे’ खेळाडू खेळणार त्यांच्याच संघातून

आयपीएल २०२२ च्या हंगामात ‘हे’ खेळाडू खेळणार त्यांच्याच संघातून

जगातील सर्वात मोठी टी-२० क्रिकेट स्पर्धा अशी ओळख असलेल्या इंडियन प्रिमियर लिगचे धुमशान लवकरच सुरू होणार आहे. आयपीएलच्या २०२२ मधील हंगाम सुरू होण्याआधी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. स्पर्धेच्या नव्या मौसमात दोन नवे संघही सहभागी झालेले पहायला मिळतील.

क्रिकेटपटूंच्या मेगा लिलावासाठी प्रत्येक संघाकडे एकूण ९० कोटी रूपयांची रक्कम खर्च करण्यासाठी असणार आहे. तर स्पर्धेतील विद्यमान आठ संघाना आपल्या चमूतील एकूण ४ खेळाडू रिटेन करण्याची म्हणजेच लिलावात न पाठवता त्यांना करारबद्ध करण्याची संधी होती. नियमानुसार ही सर्व प्रक्रिया ३० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करणे गरजेचे होते. त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्येक संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी समोर आली आहे.

सर्व आठ संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी
यामध्ये मुंबई इंडियन्स संघाने अपेक्षे प्रमाणे कर्णधार रोहित शर्माला सर्वाधिक (१६ कोटी) रक्कम देत रिटेन केले आहे. तर त्यासोबतच जसप्रीत बुमराह (१२ कोटी), सूर्यकुमार यादव (८ कोटी), आणि कायरन पोलार्ड (६ कोटी) या खेळाडूंना रिटेन केले आहे.

तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानेही कर्णधार विराट कोहली (१५ कोटी) सह, ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी) आणि मोहम्मद सिराज (७ कोटी) या खेळाडूंना रिटेन केले आहे.

पंजाब किंग्स संघाने धक्कादायक निर्णय घेत कर्णधार के. एल. राहुल याला रिटेन केलेले नाही. त्याऐवजी त्यांनी मयंक अग्रवाल (१२ कोटी) आणि अर्शदिप सिंग (४ कोटी) यांना रिटेन केले आहे.

सनरायजर्स हैदराबाद संघाने केन विल्यमसन याला सर्वाधिक १४ कोटी रूपये देत रिटेन केले आहे. तर त्यासोबतच अब्दूल समाद आणि उमरान मलिक या दोघांना प्रत्येकी ४ कोटी रूपये देऊन रिटेन केले आहे.

चेन्नई सुपर किंग्स संघानेही आपले चार खेळाडू रिटेन केले आहेत. पण या वेळी त्यांनी कर्णधार महेंद्र सिंग धोनीपेक्षाही जास्त रक्कम रविंद्र जडेजाला देऊ केली आहे. रविंद्र जडेजाला १६ कोटी देण्यात आले असून धोनीवर १२ कोटींची बोली लागली आहे. तर मोईन अली (८ कोटी) आणि ऋतुराज गायकवाडला (६ कोटी) यांनाही रिटेन करण्यात आले आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाने रिषभ पंत (१६ कोटी), अक्षर पटेल (९ कोटी), पृथ्वी शॉ (७.५ कोटी), आणि नॉर्खिया (६.५ कोटी) या चार खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांना रिटेन केले आहे.

हे ही वाचा:

पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम लागू 

‘सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले’

बॅरिकेड्स हटविण्यासाठी तीव्र आंदोलन, आमदार भातखळकर यांना अटक

तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने अपेक्षेनुसार सर्वाधिक रक्कम ही आंद्रे रसेलला (१२ कोटी) देऊ केली आहे. तर वरूण चक्रवर्ती (१२ कोटी), आणि व्यंकटेश अय्यर (८ कोटी) या युवा खेळाडूंवरही विश्वास दाखवत त्यांना रिटेन केले आहे.

तर राजस्थान रॉयल्स संघाने संजू सॅमसन (१४ कोटी), जॉस बटलर (१० कोटी) आणि यशस्वी जयस्वाल (४ कोटी) या खेळाडूंना रिटेन केले आहे.

रोहित, जडेजा ठरले सर्वात महागडे खेळाडू
या वेळी रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांना प्रत्येकी १६ कोटी रूपये मिळाल्याने ते आयपीएलमधील सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. त्यांनी विराट कोहलीचा विक्रम मोडून काढला आहे. त्यांना विराट कोहलीपेक्षा १ कोटी रूपये जास्त मिळाले आहेत.

Exit mobile version