इंडियन प्रिमियर लीगच्या चौदाव्या हंगामासाठी आज लिलाव होणार आहे. चेन्नई इथे होणाऱ्या या लिलावासाठी आयपीएलचे आठही संघ सज्ज झाले आहेत. दुपारी तीन वाजता स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर या लिलावाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
गेली तेरा वर्ष क्रिकेट रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या इंडियन प्रिमीयर लीगचा चौदावा हंगाम येऊ घातला आहे. हाच हंगाम सुरु होण्याआधी आयपीएलचा मिनी लिलाव १८ फेब्रुवारी रोजी होत आहे. या हुंगामात एकूण २९२ खेळाडूंसाठी आयपीएलचे आठ संघ बोली लावणार आहेत. यात नव्या-जुन्या सर्वच खेळाडूंचा समावेश आहे. २९२ खेळाडूंपैकी १६४ खेळाडू भारतीय असून १२५ परदेशी खेळाडू आहेत तर ३ खेळाडू हे असोसिएट राष्ट्रांचे आहेत. या लिलावासाठी एकूण १११४ खेळाडूंनी नोंदणी केली होती त्यापैकी २९२ खेळाडू लिलावासाठी पात्र ठरले आहेत.
हे ही वाचा:
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा या लिलावाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. अर्जुन तेंडुलकर पहिल्यांदाच लिलावात सहभागी होत असून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीमुळे तो या लिलावासाठी पात्र ठरला आहे. अर्जुन हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर हा मुंबई संघाकडूनच खेळणार की दुसरा कोणता संघ अर्जुनला खरेदी करणार याकडे सर्व चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
कोविडमुळे आयपीएलचा तेरावा हुंगाम हा दुबईत पार पडला होता आणि तो ही प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत. पण आता कोविडचे नियम शिथिल झाल्यामुळे क्रिकेट स्टेडियममध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांची उपस्थिती सुरु झाली आहे. त्यामुळे आयपीएलच्या नव्या हंगामाला घेऊन प्रेक्षकांमध्ये चांगलाच उत्साह आहे.