भारताचे माजी क्रिकेटर आकाश चोप्रा यांचे मत आहे की मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने ईशान किशनला निवडल्यानंतर, ईशान किशनकडे आगामी आयपीएल २०२५ मध्ये ही एक चालून आलेली सर्वोत्तम संधी आहे.
चोप्रा यांनी यूट्यूब चॅनेलवर म्हणाले, कोणत्याही कारणामुळे, तो निवड समितीच्या रडारवरून पूर्णपणे गायब झाला आहे. कोणीही त्याच्याबद्दल बोलताना दिसत नाही किंवा त्याचे महत्त्व समजून घेत नाही. त्याने रणजी ट्रॉफीमध्येही खेळून चांगली कामगिरी केली, पण तरीही त्याच्याबद्दल चर्चा झाली नाही.
मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या आयपीएल लिलावात एसआरएचने किशनला ११.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. मात्र, एसआरएचकडे आधीच अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांची मजबूत ओपनिंग जोडी आहे. जी गेल्या हंगामातील सर्वात स्फोटक सलामी जोडींपैकी एक होती.
याचा अर्थ किशनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागू शकते. ही भूमिका त्याने क्वचितच बजावली आहे. त्या नंबरवर त्याने क्वचितच फलंदाजी केलेली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध विक्रमी एकदिवसीय द्विशतक (१३१ चेंडूंमध्ये २१० धावा) झळकावूनही, किशनला संघाबाहेर करण्यात आले आणि शुभमन गिलला सलामी फलंदाज म्हणून प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर, त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.
यष्टीरक्षक-फलंदाजांच्या गटात ऋषभ पंत, केएल राहुल आणि संजू सॅमसन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किशनपेक्षा उजवे मानले जाते. किशनने गेल्या वर्षी आपला बीसीसीआयचा करारही गमावला. चोप्रा यांनी सांगितले, “तुम्ही पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकता. असा यष्टीरक्षक-फलंदाज जो ओपनिंग करू शकतो किंवा टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करू शकतो, तो अधिक फायदेशीर असतो. गौतम गंभीर म्हणत आहेत की ते सर्व एकाच ट्रेनमध्ये वेगवेगळ्या बोगींमध्ये आहेत. सर्वांना एकाच ठिकाणी पोहोचायचे आहे. मग बोगी पुढे असो किंवा मागे, त्याने काही फरक पडत नाही. याचा साधारण अर्थ असा आहे की भारतीय क्रिकेटमध्ये आता निश्चित फलंदाजी क्रम अस्तित्वात नाही.”