बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडिअमवर शनिवारी रंगलेल्या सामन्यात बेंगळुरूने गुजरातवर चार विकेटने मात केली. त्यामुळे त्यांच्या प्लेऑफमध्ये खेळण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. या विजयामुळे बेंगळुरूने आठ गुणांनिशी गुणतक्त्यात सातव्या क्रमांकावर झेप घेतली असून त्यांचे आणखी तीन सामने शिल्लक आहेत.बेंगळुरूची शिस्तबद्ध गोलंदाजी आणि फाफ डू प्लेसिस व विराट कोहली यांची दमदार भागीदारी हे सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.
बेंगळुरूने नाणेफेक जिंकून गुजरातला फलंदाजीचे आमंत्रण दिले. मात्र गुजरातची सुरुवात अतिशय वाईट झाली. मोहम्मद सिराजने वृद्धमान साहा आणि शुभमन गिल यांना बाद केले. साई सुदर्शनही फारसे काही करू शकला नाही. त्यामुळे गुजरातला पहिल्या सहा षटकांत अवघ्या २३ धावाच करता आल्या. शाहरुख खान याने डेव्हिड मिलरच्या सोबतीने चांगली खेळी केली. त्यांनी ६१ धावांची भागीदारी रचून गुजरातला सावरले. तर, विराट कोहलीने शाहरूखला धावचीत केले. त्यानंतर राहुल तेवातिया याने २१ चेंडूंत ३५ धावा केल्यामुळे गुजरातचा संघ किमान १४७ धावा करू शकला.
हे ही वाचा:
‘रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी’
तमिळनाडूमध्ये काँग्रेसनेत्याचा अर्धवट जळालेला मृतदेह
अपहरणप्रकरणी आमदार एचडी रेवण्णा यांना वडील देवेगौडा यांच्या घरातून अटक
किराणा दुकानात विकत होता ड्रग्ज; पोलिसांकडून ४ कोटी ५० लाख ७० हजारांचे ड्रग्ज जप्त
गुजरातचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेले फाफ डू प्लेसिस आणि कोहली यांनी पॉवरप्लेमध्ये ९२ धावांची भागीदारी केली. फाफ डू प्लेसिसने २३ चेंडूंत ६४ धावा करून त्याचे ४२वे आयपीएल अर्धशतक ठोकले. मात्र एक बाद ९२ अशी भक्कम असणारी धावसंख्या नंतर सहा बाद ११६ अशी झाली. जोश लिटलने चार विकेट घेतल्याने बंगळुरूचा संघ कोलमडला. त्यानंतर मैदानात उतरलेले दिनेश कार्तिक आणि स्वप्नील सिंह यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. विकेट झटपट जाण्याआधी कोहलीने १६ चेंडूंत ३५ धावा केल्या. मात्र नंतर त्याने २७ चेंडूंत ४२ धावा केल्या. मात्र नंतर नूर अहमदने त्याला बाद केले. कोहलीने दोन चौकार आणि सहा षटकार लगावले.