आयपीएल २०२३चा अंतिम सामना आज, रविवारी गुजरात आणि चेन्नईदरम्यान खेळला जाईल. गुजरातचे लक्ष्य हा करंडक आपल्याकडेच राखण्याकडेच असेल तर दुसरीकडे चेन्नईला मुंबईच्या विजेतेपदांशी बरोबरी करण्याची संधी असेल.
गेल्या वर्षीचा विजेता गुजरात आणि चेन्नईदरम्यान आज, रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामना रंगणार आहे. हा चषक आपल्याकडेच राहावा, यासाठी गुजरात निकराने लढा देईल तर चेन्नई आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईशी बरोबरी करण्याच्या ईर्षेने मैदानात उतरेल. मुंबईने आतापर्यंत पाचवेळा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरले आहे. तर, धोनीच्या चेन्नई संघाच्या नावावर चार विजेतेपदे आहेत.
आज जर गुजरात संघ विजयी झाला, तर चेन्नई आणि मुंबईनंतर विजेतेपद कायम राखणारा तो तिसरा संघ ठरेल. चेन्नईने सन २०१० आणि २०११मध्ये सलग दोनदा हा किताब जिंकला होता. तर, मुंबईने २०१९ आणि २०२०मध्ये ही कामगिरी केली होती.चेन्नई आणि गुजरातने आतापर्यंत एकमेकांविरुद्ध चार सामने खेळले आहेत. या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने चेन्नईला पराभूत केले आहे. तर, धोनीच्या चेन्नई संघाने पहिल्या पात्रता फेरीत गुजरातला पराभूत केले होते. आकडे गुजरातच्या पारड्यात असले तरी पात्रता फेरीमध्ये गुजरातवर मिळवलेला विजय चेन्नईचे मनोबल वाढवेल.
हे ही वाचा:
विरोधकांना आझादांनी दाखविला आरसा
पंतप्रधान आज नव्या संसद भवनाचे करणार लोकार्पण
पीएफआयवरील बंदीच्या रागातून गडकरींना केले ‘टार्गेट’
असा झाला मंत्रोच्चारांच्या निनादात दिमाखदार सेंगोल प्रतिष्ठापना सोहळा
धोनी रचणार इतिहास
धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतला हा २५० वा सामना असेल. अशी कामगिरी करणारा तो पहिले क्रिकेटपटू असेल. सर्वाधिक आयपीएल सामने खेळण्याचा विक्रम याआधीच धोनीच्या नावावर आहे. त्याच्या मागे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याने नुकताच आयपीएलचा २४३वा सामना खेळला आहे.
शुभमन गिलच्या नजरा विक्रमावर
आयपीएल २०२३मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असणारा गुजरातचा सलामीचा फलंदाज शुभमनच्या नजरा विराट कोहलीच्या ९०० धावांच्या क्लबमध्य सामील होण्याकडे असतील. यंदाच्या हंगामात ८५१ धावा करणारा शुभमन गिल फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. जर त्याने आज ४९ धावा केल्या तर तो एका हंगामात ९००धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज होईल. या यादीत सध्या केवळ विराट कोहलीचे नाव आहे. सन २०१६मध्ये विराट कोहलीने ९७३ धावा केल्या होत्या. शुभमन याने जर आज १२३ धावा कुटल्या तर, तो विराट कोहलीचा हा विक्रमही मोडेल.