आयपीएल २०२२चा रणसंग्राम मुंबई, पुण्यात; या तारखेपासून सुरू होणार सामने

आयपीएल २०२२चा रणसंग्राम मुंबई, पुण्यात; या तारखेपासून सुरू होणार सामने

साऱ्या देशाचं लक्ष असणारी बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा म्हणजे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या सत्राला लवकरच सुरुवात होणार आहे. गुरुवारी, २४ फेब्रुवारी रोजी आयपीएल गव्हर्निंग काउंसिलची बैठक पार पडली. या बैठकीत आयपीएल स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या सत्रातील आयपीएल मॅचला येत्या २६ मार्चपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षी कोरोना महामारीच्या भीषण परिस्थतीमुळे आयपीएलचे सामने भारताबाहेर खेळवण्यात आले होते. मात्र, यंदा कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्यामुळे या सत्राचे सर्व सामने हे भारतातच खेळवले जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन सामने आयोजित करण्यात येणार आहेत.

यंदाच्या आयपीएलचे बहुतांश सामने हे पुणे आणि मुंबईतच खेळवले जाणार आहेत. मुंबईत ५५ सामने तर पुण्यात १५ सामने खेळवण्यात येणार आहेत. मुंबईतील ५५ सामन्यांपैकी २० सामने हे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, २० सामने डी वाय पाटील स्टेडियमवर आणि १५ सामने हे सीसीआयमध्ये होणार आहेत. पुण्यात १५ सामने खेळवण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. आयपीएलच्या नियोजनासाठी आज पुन्हा एकदा आयपीएल गव्हर्निंग काउंसीलची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.

हे ही वाचा:

युद्धाने कोणतेही प्रश्न सुटू शकत नाहीत; पंतप्रधान मोदींचा पुतीन यांना सल्ला

मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी धडकले आयकर खाते

शिवसेनेची आंदोलनाला टांग

मध्य प्रदेशमध्ये ११ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी

यंदाच्या आयपीएल सत्रात प्रेक्षकांना मैदानात जाऊन सामने पाहण्याची संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. यंदा लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांसह दहा संघ मैदानात लढतीसाठी उतरणार आहेत.

Exit mobile version