जगातली सर्वात मोठी टी-२० क्रिकेट स्पर्धा अशी ओळख असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा नवा हंगाम लवकरच सुरू होत आहे. नव्या हंगामात दोन नवे संघ दिसणार असून यापैकी एक संघ हा अहमदाबादचा असणार आहे. या नव्या संघाचे बारसे नुकतेच पार पडले असून अहमदाबाद टायटन्स असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या नव्या संघाच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून ही घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल मधील नवा अहमदाबाद संघ हा सीव्हीसी कॅपिटल्स या कंपनीच्या मालकीचा आहे. सीव्हीसी कॅपिटल्स कंपनीने तब्बल ५,६२५ कोटी रुपयांना हा संघ विकत घेतला आहे.
हे ही वाचा:
अभिनेत्री माही गिलचा भाजपामध्ये प्रवेश
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला मिळाल्या पहिल्या महिला कुलगुरू
कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा वाद
अरुणाचलमध्ये हिमस्खलनात लष्कराचे सात जवान अडकले
अवघ्या काही दिवसांवर आयपीएल २०२२ साठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये स्पर्धेतील संघ सहभागी होऊन खेळाडूंसाठी बोली लावतील. अहमदाबाद हा संघ नवा असल्यामुळे त्यांना ‘अर्ली बर्ड’ या पर्यायाच्या अंतर्गत तीन खेळाडू आधीच निवडण्याचा पर्याय उपलब्ध होता. याचा वापर करून त्यांनी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला पंधरा कोटी रुपयात खरेदी केले आहे. त्यासोबतच अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान यालाही पंधरा कोटी रुपयात विकत घेतले आहे. तर या दोघांसोबत सलामीवीर शुभमन गिल हा देखील अहमदाबाद संघाचा भाग असे. त्याला आठ कोटी रुपये देऊन संघाने खरेदी केले आहे.
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा हा अहमदाबाद संघाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. तर गॅरी कर्स्टन हे या संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक आणि मेंटर असतील.