ऋतुराज धावुनी आला

ऋतुराज धावुनी आला

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यात चेन्नईचा संघ विजय झाला आहे. चेन्नई संघाने मुंबईला २० धावांनी पराभूत केले आहे. चेन्नईचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा या सामन्याचा हिरो ठरला आहे. गायकवाडच्या एकाकी झुंज देण्यामुळे चेन्नई संघ चांगल्या धावा करू शकला.

कालपासून म्हणजेच रविवार, १९ सप्टेंबर पासून आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. या उत्तरार्धाचा पहिलाच सामना आयपीएल मधील दोन सर्वात यशस्वी संघांमध्ये रंगलेला पाहायला मिळाला. चेन्नई संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरतो की काय असे सुरुवातीला वाटू लागले होते. कारण मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांच्या तोंडाला फेस आणला होता. चेन्नई संघाचे चार फलंदाज हे स्वस्तात माघारी परतले होते. तर अंबाती रायडू हा जखमी होऊन माघारी परतला होता. पण अशा परिस्थितीत सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने एक खांबी तंबू उभारत चेन्नईचा डाव सावरला. त्याने ५८ चेंडूमध्ये ८८ धावांची खेळी केली. या जोरावर चेन्नई संघाची धावसंख्या ही २० षटकांमध्ये १५६ इतकी झाली होती.

१५७ धावांचे विजय लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मुंबई संघ मैदानात उतरला. मुंबईची स्थिती चेन्नईपेक्षा जरी बरी वाटत असली तरीही चांगली नक्कीच नव्हती. चेन्नई संघाच्या गोलंदाजींसमोर मुंबईचे फलंदाज फार टिकू शकले नाहीत. सौरभ तिवारी याने नाबाद अर्धशतकी खेळी करत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अपेक्षित साथ इतर फलंदाजांकडून मिळाली नाही.

२० षटकांमध्ये मुंबई संघ केवळ १३६ धावाच करू शकला. तर बदल्यात त्यांचे आठ खेळाडू बाद झाले. मुंबईचे दोन महत्त्वाचे खेळाडू कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या सामन्यात खेळत नव्हते. त्यामुळे मुंबई संघाचे नेतृत्व हे कॅरन पोलार्ड करत होता. हे दोन महत्त्वाचे खेळाडू नसल्याचा फटका मुंबई संघाला बसल्याचे म्हटले जात आहे.

Exit mobile version