पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी मुंबईतील जिओ सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४’च्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी फिनटेक क्षेत्राबद्दल माहिती देत या क्षेत्रासाठी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचून दाखवला.
जगभरातील लोक पूर्वी भारतातील सांस्कृतिक विविधता पाहून थक्क व्हायचे; आता फिनटेक डायव्हर्सिटी पाहून थक्क होतात
नरेंद्र मोदी यांनी या फेस्टमधील प्रदर्शनांना भेटही दिली तसेच उपस्थितांचे कौतुक करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रदर्शनांमधून त्यांनी एक वेगळेच जग अनुभवले. पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, पूर्वी लोक भारतात यायचे तेव्हा येथील सांस्कृतिक विविधता पाहून थक्क व्हायचे. पण, आज जगभरातून लोक जेव्हा भारतात येतात तेव्हा येथील फिनटेक डायव्हर्सिटी पाहून भारावून जातात. विमानतळावर उतरल्यापासून ते स्ट्रीट फूडपर्यंत सर्वत्र भारताची फिनटेक डायव्हर्सिटी पाहायला मिळते. गेल्या १० वर्षांमध्ये भारतातील फिनटेक क्षेत्रात ३१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. या काळात देशातील फिनटेक स्टार्टअपमध्ये ५०० टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय, स्वस्त मोबाईल फोन, स्वस्त डेटा आणि झिरो बॅलन्स जनधन खात्यांनी भारतात कमाल केली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
गावांमध्ये बँकेच्या शाखा नाहीत, इंटरनेट नाही तर रिचार्जिंग कुठून करणार? हे प्रश्न चहावाल्याला विचारले जायचे
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, “पूर्वी स्वतःला विद्वान समजणारे लोक संसदेत उभं राहून भारतातील फिनटेक क्रांतीविषयी प्रश्न उपस्थित करायचे. जेव्हा सरस्वती बुद्धी वाटत होती, तेव्हा हेच लोक रस्त्यात पहिले उभे होते,” असा सणसणीत टोला नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला आहे. भारतातील गावांमध्ये बँकेच्या शाखा नाहीत, इंटरनेट नाही, वीज नाही, मग रिचार्जिंग कुठून करणार? असे प्रश्न माझ्यासारख्या चहावाल्याला विचारले जायचे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. पण, आज एका दशकात भारतातील ब्रॉडबँड युजर्सची संख्या ६ कोटीवरुन ९४ कोटीपर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.
जगातील अर्ध्याहून अधिक रियल टाईम डिजिटल व्यवहार हे भारतात होतात
नुकतीच नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी अशा ‘प्रधानमंत्री जन धन योजने’ला दहा वर्षे पूर्ण झाली. या योजनेबद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “आज देशातील ५३ कोटी लोकांकडे जनधन खाती आहेत. याचा अर्थ गेल्या १० वर्षांमध्ये आम्ही युरोपियन महासंघातील देशांच्या एकत्रित संख्येइतक्या लोकांना बँकिग व्यवस्थेशी जोडले आहे,” असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. गेल्या १० वर्षांमध्ये जनधन, आधार कार्ड आणि मोबाईल यांनी व्यवहारांना गती दिली आहे. पूर्वीच्या काळी ‘कॅश इज किंग’ म्हटले जायचे. पण, आज जगातील अर्ध्याहून अधिक रियल टाईम डिजिटल व्यवहार हे भारतात होतात.
हे ही वाचा:
‘शिवलिंगावरील विंचू’ वक्तव्यामुळे पंतप्रधानांची बदनामी; थरूर यांना न्यायालयाने फटकारले
गोरेगावमध्ये हिट अँड रन; अल्पवयीन चालकाच्या गाडीच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
राजकोट किल्ला दुर्घटनेप्रकरणी चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक
मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीत रस्सीखेच नाही!
जनधन योजनेने महिलांसाठी आर्थिक सबलीकरणाचा पाया रचला
संपूर्ण जगात भारताचा युपीआय हे फिनटेकचे सर्वात मोठे उदाहरण बनले आहे. आज शहरात किंवा गावात कोणताही ऋतू असतो, भारतातील बँकिग सर्व्हिस २४ तास सुरु असते. कोरोनासारख्या संकटकाळातही भारत हा बँकिग व्यवस्था सुरळीत असणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक होता. जनधन बँक खाती हे महिला सबलीकरणाचे माध्यम झाले आहे. त्यामुळे महिलांना बचत आणि गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून तब्बल २७ ट्रिलियनची कर्जे देण्यात आली, याच्या ७० टक्के लाभार्थी या महिला आहेत. जनधन योजनेने महिलांसाठी आर्थिक सबलीकरणाचा पाया रचला आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.