उद्रेकानंतर बदलापूरमध्ये इंटरनेट सेवा बंद; जमावबंदी लागू

खबरदारीचा उपाय म्हणून बदलापूर रेल्वे स्टेशनबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

उद्रेकानंतर बदलापूरमध्ये इंटरनेट सेवा बंद; जमावबंदी लागू

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारानंतर मंगळवार, २० ऑगस्ट रोजी नागरिकांचा आणि पालकांचा उद्रेक पाहायला मिळाला. एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. आरोपीला बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको केला होता. तर, शाळा परिसरात आंदोलन करून तोडफोड करण्यात आली. नागरिकांनी तब्बल १० तास रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करून निषेध व्यक्त केला. अखेर आंदोलक नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

यानंतर पुन्हा नागरिकांचा उद्रेक होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून बुधवार, २१ ऑगस्ट रोजी देखील पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्टेशनबाहेर मोठा बंदोबस्त ठेवला आहे. संतप्त नागरिकांनी पुन्हा आंदोलन करू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. बुधवारी सकाळपासूनच पोलीस बदलापूर स्टेशनच्या बाहेर तैनात आहेत. तर, मध्य रेल्वेची रेल्वेसेवा सध्या सुरळीत सुरु आहे. केवळ खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे. तर, बदलापूरमध्ये इंटरनेटसेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच, काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बदलापूरमध्ये कलम १६३ लागू करण्यात आला आहे. शहरातील दुकानं देखील बंद आहेत.

हे ही वाचा :

बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांवर अखेर पोलिसांचा लाठीमार !

टेक्सासमध्ये भगवान हनुमानाची ९० फूट उंची मूर्ती स्थापन !

बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार…!

बांगलादेश : हिंदूंच्या रक्षणासाठी स्वतंत्र उपजिल्हा आणि बाजारपेठांची मागणी !

बदलापूर आंदोलन प्रकरणी हजार आंदोलनकर्त्यांवर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ४० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अजूनही पोलिसांकडून धरपकड सुरूच आहे. रेल्वे अडवणे, सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण करणे, पोलिसांवर दगडफेक करणे, हिंसक आंदोलन करणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे विविध कलमानुसार कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version