भारतीय नौदलाची ताकद वाढवणारी ‘आयएनएस करंज’ ही पाणबुडी नौदलात दाखल झाली आहे. करंज ही स्कॉरपेन क्लासची पाणबुडी बुधवारी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह आणि निवृत्त ऍडमिरल व्ही.एस.शेखावत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या प्रसंगी बोलताना नौदल प्रमुख करमबीर सिंह यांनी पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीचे कौतुक केले. “भारतीय नौदलाच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी आत्मनिर्भरता हाच मूलमंत्र आहे. गेली सात दशके भारतीय नौदल हे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देत आले आहे.” असे ऍडमिरल करमबीर सिंह म्हणाले.
हे ही वाचा:
“सध्या भारतीय नौदलाने ऑर्डर केलेल्या ४२ युद्धनौका आणि पाणबुड्यांपैकी ४० ची निर्मिती भारतात होत आहे.” अशीही माहिती नौदल प्रमुखांनी दिली.
‘आयएनएस करंज’ ही स्कॉरपेन क्लासची पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याने नौदलाची शस्त्रसज्जता वाढली आहे. स्कॉरपेन क्लासच्या पाणबुड्या या जगातल्या काही अद्ययावत पाणबुड्यांपैकी एक आहे. या पाणबुडीत जगातील अद्ययावत तंत्रज्ञान आणि शस्त्रसज्जता आहे. या पाणबुडीला ‘सायलेंट किलर’ असे म्हटले जाते. कारण ही पाणबुडी कमीतकमी आवाजात शत्रूच्या गोटात जाऊन आपल्या लक्ष्याचा वेध घेते.