पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांच्या विशेष उपस्थितीत ४ डिसेंबर रोजी नौदल दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त जोरदार तयारीदेखील सुरू आहे. नौदल दिनाच्या निमित्ताने तारकर्लीजवळ समुद्रात मंगळवार, २८ नोव्हेंबर रोजी आयएनएस ब्रह्मपुत्रासह अन्य दोन मोठी जहाजे दाखल झाली आहेत. याशिवाय इतर जहाजेही येत्या दोन दिवसांत तारकर्लीजवळ दाखल होतील.
नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम तारकर्ली एमटीडीसी येथील समुद्रकिनारी होणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, अन्य वरिष्ठ व्यक्ती हजर असणार आहेत. दरम्यान, तारकर्लीलगतच्या समुद्रात आयएनएस ब्रह्मपुत्रा यासह अन्य जहाजे दाखल झाली असल्याचे दिसून आले. ७० मोठी जहाजे येथे दाखल होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार ही जहाजे दाखल होण्यास सुरुवात झाली आहेत. अन्य जहाजे येत्या दोन दिवसांत दाखल होतील.
उपस्थितांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देऊळवाडा ते तारकर्ली तसेच शहरातील तारकर्ली नाका ते तारकर्ली या मुख्य मार्गावर दुपारी चार ते रात्री आठ यावेळेत नागरिकांनी ये-जा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या काळात अत्यावश्यक सेवेच्या दुकानाव्यतिरिक्त अन्य कोणतीही दुकाने उघडी ठेवू नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नौदल दिनाच्या निमित्ताने सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी २ आणि ३ डिसेंबर या दोन दिवशी तारकर्ली मुख्य मार्गावर पोलिसांतर्फे रंगीत तालीम घेतली जाणार आहे, अशी माहिती शिरसाट यांनी दिली. नौदल दिनानिमित्त नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगायची आहे, याबाबत पोलिस खात्यातर्फे सायंकाळी वायरी भूतनाथ ग्रामपंचायत येथे बैठक घेण्यात आली.
हे ही वाचा:
‘शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख असे पदच नाही’
‘भारताने हमासला प्रतिबंधित संघटना म्हणून जाहीर करावे’!
सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पीएफ घोटाळा प्रकरणी गुन्हा
ठाकरे गटाचे उपनेते, माजी महापौर दत्ता दळवींना अटक; मुख्यमंत्र्यांवरचे आक्षेपार्ह विधान भोवले
नौदलाचे जवानही मोठ्या संख्येने तारकर्ली येथे दाखल झाले असून, त्यांच्याकडून रंगीत तालीम, कवायती केल्या जात आहेत. मंगळवारी सायंकाळी लढाऊ विमानांनी आपल्या सरावास सुरुवात केली आहे. शिवाय जलक्रीडा आणि किल्ले प्रवासी वाहतूक सेवा सध्या बंद करण्यात आली आहे.